दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, "कोण आहे रे तिकडे?" त्यावर त्यातील एकाने म्हटले, "आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत." दूसरा व्यक्ती म्हणाला, "तुम्हाला यमसदनी पोहोचवण्यासाठी आम्हाला धाडले आहे." यावर त्यांनी विचारले की, "मी तुमचा काय अपराध केला आहे, ज्यामुळे तुम्ही मला मारत आहात? यावर ते मारेकरी म्हणाले, "तुम्ही आमचे काही वाईट केले नाही. पण तुमचा निकाल लावण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. त्यावर ते विचारतात, "मला मारून तुमचा काय फायदा? त्यावर मारेकरी म्हणाले, "तुम्हाला मारल्यावर आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत." मारेकऱ्यांचे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले, "अरे वा! माझ्या मृत्यूने तुमचा फायदा होणार आहे, तर घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी सद्भाग्य आणि धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरून सूरी फिरवावी हे माझे भाग्यच. चला आटपा लवकर. माझे आयुष्य दलितांसाठीच आहे. कसे झाले तरी माझ्या मरणाने सुद्धा गरिबांचे हित होत आहे." हे उत्तर ऐकून मारेकरी एकदम भानावर आले आणि त्यांनी त्यांची माफी मागितली. या मारेकऱ्यांना मोठ्या मनाने माफ करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून हे होते आपले महात्मा जोतिबा फुले. महात्मा जोतिबा फुले यांना मारण्यासाठी आलेले मारेकरी फुले यांनी काढलेल्या उद्गाराने भानावर आले. तसेच ज्यांनी आम्हाला तुम्हाला मारण्यासाठी पाठवले, आम्ही त्यांना मारण्यासाठी जातो. परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली. यावर महात्मा फुले यांनी त्यांना समजावून सांगितले की सूडबुद्धी कधीच नसावी. या प्रसंगानंतर दोघे मारेकरी महात्मा फुले यांचे सहकरी बनले. यातील एकाचे नावे होते रोडे तर दुसरे होते पं. धोंडिराम नामदेव. महात्मा जोतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला, वंचित आणि शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी समर्पित केल्यामुळे त्यांना जनतेने 'महात्मा' ही उपाधी बहाल केली. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका महान होता की, ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन केले होते, अगदी त्याचप्रमाणे फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन मारेकऱ्यांचे विचारपरिवर्तन होऊन ते त्यांच्या सामाजिक चळवळीत सक्रिय झाले. त्यापैकी एक त्यांचे अंगरक्षक बनले तर दुसरे धोंडिराम कुंभार हे सत्यशोधक समाजाचे पंडित होऊन त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथरचना केली. हे क्रांतीकारी समाजकार्य करत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुराणमतवादी लोकांच्या टोमण्यांचा, विरोधाचा आणि शारीरिक त्रासाचा धैर्याने सामना करावा लागला, तरीही त्यांनी आपले सामाजिक समतेचे व्रत कधीही सोडले नाही. वयाच्या 21 व्या वर्षी मानावर आघात वयाच्या 21 व्या वर्षी जोतिरावांना त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. वरातीमध्ये चालत असताना तिथल्या सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ओळखले आणि त्यांचा तीव्र शब्दांत अपमान केला. "तू स्वतःला आमच्या बरोबरीचा समजतोस का? तुला आमचे रीतिरिवाज ठाऊक नाहीत का? चल मागे हट आणि सर्वात शेवटी चाल," अशा शब्दांत त्यांच्यावर डाफरण्यात आले. या अनपेक्षित आणि सार्वजनिक अपमानाचा तरुण जोतिबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांना सामाजिक विषमतेवर अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्याला प्राण्यापेक्षाही हीन वागणूक का मिळते, याचा विचार करताना त्यांना जाणवले की या सामाजिक भेदाचे आणि विषमतेचे मूळ 'शिक्षणाच्या अभावात' आहे. केवळ एका विशिष्ट वर्गाकडे शिक्षणाचे अधिकार एकवटल्यामुळे बहुजन समाज शेकडो वर्षांपासून गुलामगिरीत अडकला आहे, हे त्यांनी ओळखले. जोपर्यंत शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली होत नाहीत, तोपर्यंत ही गुलामगिरीची बंधने तोडता येणार नाहीत, या खात्रीतून त्यांनी समाजातील वंचित आणि शोषितांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा क्रांतिकारी निर्धार केला. स्वतःच्या घरातील हौद सर्वांसाठी खुला केला\ 1868 साली महात्मा फुले यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आणि आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. त्याकाळी पुण्यात पेशव्यांनी बांधलेले अनेक हौद असूनही अस्पृश्यांना तिथून पाणी घेण्यास बंदी होती, ज्यामुळे कडाक्याच्या उन्हातही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागे. समाजातील ही अमानवीय विषमता जोतिरावांना अस्वस्थ करत होती, म्हणूनच त्यांनी मानवतेच्या भूमिकेतून आपल्या हक्काचे पाणी तहानलेल्या शोषितांसाठी खुले करून दिले. या निर्णयामुळे पुण्यात सनातनी लोकांमध्ये विरोधाची तीव्र लाट उसळली. सनातन्यांनी केवळ महात्मा फुलेंनाच लक्ष्य केले नाही, तर त्यांच्या नातेवाईकांना आणि समाजातील इतर लोकांनाही वाळीत टाकण्याची धमकी दिली. मात्र, पुरोहित वर्गाच्या अशा कोणत्याही दबावाला किंवा सामाजिक बहिष्काराच्या धमक्यांना जोतिबा अजिबात डगमगले नाहीत. उलट, पुराणमतवादी विचारांचा समाजावर असा पगडा का आहे आणि या मानसिक गुलामगिरीची मुळे नेमकी कुठे आहेत, याचे सखोल चिंतन त्यांनी सुरू केले. गुलामगिरी याच वैचारिक मंथनातून त्यांनी 'गुलामगिरी' हा अजरामर ग्रंथ लिहिला, ज्याला डॉ. सदानंद मोरे यांनी 'मॅग्नम ओपस' अर्थात 'महाकृती' असे संबोधले आहे. धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून समाज जातीमुक्त व्हावा, ही जोतिरावांची यामागची मुख्य धारणा होती. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची गुलामीतून मुक्तता करणाऱ्या तिथल्या न्यायप्रेमी जनसमूहाला त्यांनी हा ग्रंथ कृतज्ञतापूर्वक अर्पण केला असून, समतेचा लढा हा केवळ स्थानिक नसून जागतिक आहे, हेच त्यांनी या अर्पणपत्रिकेतून अधोरेखित केले. महात्मा फुले यांनी 1869 मध्ये रचलेल्या एका पोवाड्यात विद्यादानाचे काम गांभीर्याने न करणाऱ्या शिक्षकांवर ओढलेले ताशेरे आजही मार्गदर्शक ठरतात. कष्टकरी समाजाने भरलेल्या शिक्षणकरातून वेतन मिळवूनही त्यांच्या मुलांना नीट न शिकवणाऱ्या पंतोजींच्या आळशी वृत्तीचे त्यांनी वाभाडे काढले. जेवून झोपती गार|| नंतर न्युजपेपर|| लिहिती पत्र अखेर|| थंडाई पडल्यावर || शाळेत जाती घडीभर|| शिकवितीं भावलें तर||, अशा शब्दांत त्यांनी तत्कालीन शिक्षकांच्या बेजबाबदार दिनक्रमावर प्रखर टीका करत त्यांना समाजवास्तवाचा आरसा दाखवला. वर्णवर्चस्व आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करताना जोतीरावांनी 'राष्ट्र' या संकल्पनेची अत्यंत महत्त्वाची मांडणी केली. जोपर्यंत शूद्र, अतिशूद्र, भिल्ल आणि कोळी बांधव सुशिक्षित होऊन विचाराने संघटित होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने एक राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. केवळ मूठभर उच्चवर्णीय लोकांनी स्थापन केलेल्या काँग्रेसला राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार किती, असा मूलभूत प्रश्न त्यांनी आपल्या 'सार्वजनिक सत्य धर्म' या ग्रंथातून उपस्थित करत सर्वसमावेशक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. महात्मा फुले यांनी वर्णवर्चस्व आणि सामाजिक विषमतेच्या विचारसरणीला आपल्या साहित्यातून प्रखर विरोध केला असून खऱ्या 'राष्ट्रा'ची अत्यंत स्पष्ट व्याख्या मांडली. त्यांच्या मते, जोपर्यंत शूद्र-अतिशूद्र, भिल्ल आणि कोळी यांसारखा संपूर्ण बहुजन समाज सुशिक्षित होऊन वैचारिकदृष्ट्या संघटित व एकजीव होत नाही, तोपर्यंत देशाला खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही. केवळ एका विशिष्ट उच्चवर्णीय घटकाने पुढाकार घेऊन स्थापन केलेली संस्था संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असे सांगून त्यांनी समावेशक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि सर्व घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्रीयत्वाचा दावा अपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांच्या जन्मजात श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला आणि जातिवादाला प्रखर विरोध केला, मात्र याचा अर्थ ते ब्राह्मण समाजाचा द्वेष करत होते असा मुळीच होत नाही. त्यांच्या सामाजिक चळवळीत त्यांना खांद्याला खांदा लावून साथ देणारे अनेक जिवलग मित्र हे ब्राह्मण समाजातीलच होते. केवळ विरोध न करता, ब्राह्मण समाजातील अनिष्ट रूढींमुळे निर्माण झालेल्या विशिष्ट समस्यांवर जाणीवपूर्वक उपाय शोधून त्यांचे जीवन सुसह्य करण्याचे कार्यही जोतीरावांनी तितक्याच आस्थेने केले. तत्कालीन ब्राह्मण समाजात विधवांच्या पुनर्विवाहावर बंदी असल्याने अनेक तरुण विधवांना सामाजिक अवहेलनेपोटी जीवघेण्या संकटांना सामोरे जावे लागे. अशा स्त्रियांना लोकलज्जेस्तव अघोरी पद्धतीने गर्भपात करावा लागू नये, यासाठी जोतीरावांनी ठिकठिकाणी जाहिराती लावून अशा मातांची गुप्तरित्या बाळंतपण करण्याची आणि बाळाचा सांभाळ करण्याची सुरक्षित सोय केली. सावित्रीबाईंनी या बालकांचा मातेच्या मायेने सांभाळ केला आणि यातूनच एका मुलाला त्यांनी 'यशवंतराव' नावाने दत्तक घेऊन आपला वारसदार केले, जे फुले दांपत्याच्या अफाट मानवतावादी दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण ठरले. आजही जोतिबा फुले आणि सावित्रीबाई अजूनही म्हणजे आजच्या काळातही प्रेरणा ठरतात.. आणि त्यांनी घालून दिलेला शिक्षणाचा पायंडा असेल अथवा शिक्षणाचे महत्त्व मी माझ्या परीने पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही देखील ते करावे अशी माझी विनंती आहे..
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hEdz45g
"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले
April 10, 2026
0