देशातील आठवे ज्योतर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बुधवारी ता. 26 पहाटे दोन वाजता नागनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेवच्या गजराने परिसरातील वातावरण भक्तीमय झाल्याचे चित्र होते. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवाला सुरवात झाली आहे. या यात्रा महोत्सवासाठी संस्थान प्रशासनाने मागील एक महिन्यापासून जय्यत तयारी केली होती. मंदिराच्या परिसरात स्वच्छता, भाविकांना पिण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था, गर्दीमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. या शिवाय मेंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. तर गर्दी लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या परिसरात पाहणी करून पोलिस बंदोबस्तासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे गस्त सुरु केली आहे. दरम्यान, मंगळवारी ता. 25 मध्यरात्री मंदिर फुलांच्या माळांनी सजविण्यात आले. त्यानंतर साडेबारा वाजता शासकिय महापुजा झाली. यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सपत्नीक नागनाथ महादेवाची पुजा केली. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या यापुजेमध्ये नागनाथाला दुग्धभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिदर भोपी, वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांच्यासह संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी आले आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांतून हर हर महादेव, बम बम भोले चा गजर सुरु होता. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. औंढा नागनाथ कडे येणाऱ्या भाविकांचा ओघ सकाळी सहा वाजल्यापासून वाढला आहे. भाविक मिळेल त्या वाहनाने औंढ्यात दाखल होत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अभिषेक बंद केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/x4MY981
औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर:शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले, पहाटे पासूनच गर्दी
February 25, 2025
0