हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव बुधवारी (१९ फेब्रुवारी) केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भगवेमय वातावरण झाले अाहे. शिवभक्तांच्या उत्साहाला मंगळवारपासूनच उधाण आले आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरसह अनेक शहरांत मध्यरात्रीपासून सोहळ्याला सुरुवात झाली होती. बुधवारी बहुतांश शहरांत मिरवणुका व विविध समाजाभिमुख कार्यक्रमांनी छत्रपतींची जयंती साजरी करण्याची तयारी करण्यात अाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही जयंतीच्या पूर्वसंध्येला हजाराे शिवप्रेमींनी क्रांती चाैकात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घाेषणा देत छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले. आग्रा - सलग तिसऱ्या वर्षी मर्दानी खेळ, आतषबाजीसह भव्य सोहळा उत्तर प्रदेशातील एेतिहासिक आग्रा येथील किल्ल्यात सलग तिसऱ्या वर्षी छत्रपती शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या साेहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त तिकडे रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे विनोद पाटील यांच्या देवगिरी अजिंक्य प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सोहळा साजरा केला जातो. वैशिष्ट्ये : शिवजन्माचा पाळणा, अफझल खान वधाच्या प्रसंगाचे नाट्यरूपांतर, मर्दानी खेळ, डिजिटल आतषबाजी, नितीन सरकटे यांचे शिवगायन आदी कार्यक्रम होतील. शिवनेरी - मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री करणार अभिवादन, नंतर महाआरतीही छत्रपती शिवरायांचा जन्म जिथे झाला त्या शिवनेरी गडावर (पुणे जिल्हा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा होईल. सर्व मान्यवर व असंख्य शिवभक्त बालशिवाजी आणि जिजामातेच्या प्रतिमेला अभिवादन करतील. तिथे पारंपरिक रीतीने पाळणा हलवण्याचा कार्यक्रमही होईल. सायंकाळी ५ वाजता महाआरती तर ६ वाजता त्यांच्या जीवनावरील विविध पैलूंचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा निघेल वैशिष्ट्ये : गडाच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये छत्रपतींच्या जीवनावरील महानाट्याचा प्रयोग, संगीत रजनी, कुस्ती स्पर्धा, मर्दानी खेळ, फायर शो, बैलगाडा शर्यतीही होणार आहेत. जयपूर - प्रथमच जन्मोत्सवासह भव्य मिरवणूक; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राजस्थानातील जयपूर शहरातील बिर्ला ऑडिटोरियम हॉलमध्ये भारत क्रांती मिशनचे पदाधिकारी शिवजयंतीचा सोहळा साजरा करणार आहेत. राजस्थानचे राज्यपाल व छत्रपती संभाजीनगर येथील नेते हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह काही मंत्री, लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने जयपूरमध्ये प्रथमच छत्रपतींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात मोठ्या संख्येने मराठींसह हिंदी भाषिक शिवभक्त सहभागी होतील. या मिरवणुकीसाठी महाराष्ट्रातून सुमारे १ हजार किलोमीटरवरून छत्रपतींची भव्य प्रतिमा जयपूरमध्ये नेण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत शिवप्रेमी जयपूर दणाणून टाकणार आहेत. वैशिष्ट्ये : 22 फेब्रुवारी रोजी जैसलमेर जिल्ह्यात पाक सीमेवर तनोट राय माता मंदिरात सीआरपीएफ जवानांसोबत जयंती सोहळा. ‘आम्ही पुणेकर’च्या पुढाकारातून ८ मार्चला पुतळा बसवणार, १२ राज्यांतून शिवयात्रा पुणे | ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने व अखिल जपान भारतीय महासंघातर्फे जपानच्या टोकियो शहरातही ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली. पुण्यात तयार केलेल्या या पुतळ्याची १२ राज्यांतून ८५०० किलोमीटर शिवस्वराज्य यात्रा नुकतीच काढण्यात आली. ‘लिम्का बुक’मध्ये त्याची नोंदही झाली. शिल्पकार विवेक खटावकर यांनी २३० किलोचा हा फायबर आणि एकसंध स्टीलचा पुतळा मुलगा विराज आणि विपुल यांच्या मदतीने दीड महिन्यात साकारला आहे. या सोहळ्याचे सोशल मीडियावर लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uvVrlHB
स्वराज्यसूर्याचा जन्माेत्सव:शिवनेरीवर मुख्य साेहळा, टाेकियाेत पुतळा; जयपूरला प्रथमच मिरवणूक, आग्ऱ्यातही जयंती साेहळा
February 18, 2025
0