शालेय शिक्षणानंतर मोटार मेकॅनिक ट्रेडमध्ये वेगळे क्षेत्र निवडले पाहिजे असे वाटले. वडिलांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी एसटी महामंडळात मोटार मेकॅनिक होण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या त्रिवेणी कांबळे बसमध्ये काय बिघाड झाला हे गाडीच्या आवाजावरून ओळखतात. खास महिला दिनानिमित्त त्यांच्याविषयी...त्रिवेणी यांचे शालेय शिक्षण पूर्णा तालुक्यात झाले. नंतर त्यांनी परभणी येथून मोटार मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय केला. वडीलही आयटीआय झालेले असल्याने त्यांना कामाची पूर्ण कल्पना होती. आपण वेगळे क्षेत्र निवडावे यासाठी वडिलांनी पाठिंबा दिल्याचे त्या सांगतात.२००८ मध्ये त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आगारात मोटार मेकॅनिक म्हणून रुजू झाल्या. पुरुषी वर्चस्वाच्या या क्षेत्रात रुजू झालेल्या त्रिवेणी कांबळे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटीच्या पहिल्या मोटार मेकॅनिक आहेत. ‘सुरुवातीला काम अवघड वाटायचं, पण सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी कधीही ही महिला म्हणून काम करते असे भासू दिले नाही. काम करताना नेहमीच प्रोत्साहन दिलं,’ असे त्या सांगतात. कामाचे समाधान, मुलांनाही अभिमान या क्षेत्रात १८ वर्षं झाली. कधी कुठे गाडी बंद पडली तर तिथे जाऊन दुरुस्ती करण्याचे कामही त्या करतात. सुरुवातीला असे प्रसंग यायचे त्या वेळी लोक कुतूहलाने पाहायचे. ‘एसटीचे इंजिन कसे बाई पटापटा उघडते,’ असे म्हणायचे. या कामाचे खूप समाधान आहे, असेही त्रिवेणी सांगतात. त्रिवेणी कांबळे यांना दोन मुले असून मुलांनाही त्यांच्या कामाचा अभिमान वाटतो. त्यांनी सांगितले की, शाळेत कुणी मुलांना विचारलं तुझी आई काय करते, तर अभिमानाने ते सांगतात, ‘गाडी दुरुस्त करते.’
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/BiFnfsP
18 वर्षांपासून एसटी बसच्या नटबोल्टसोबत जडली मैत्री:त्रिवेणी कांबळे आवाजावरून ओळखतात बिघाड
March 07, 2025
0