हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागात सेवक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवत फोन पे वरून ७० हजार रुपये ट्रा्न्सफर करून घेणाऱ्या तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागात कार्यरत दत्ता कुंभार यांची नांदेड येथील अनिरुध्द उर्फ अनिकेत पांढरे याची पूर्वीचीच ओळख होती. गुरुवारी ता. ६ दुपारीच्या सुमारास अनिरुध्द दोन मित्रांसह हिंगोलीत आला होता. यावेळी त्याने दत्ता यांना माझ्या वडिलांचे सेवानिवृत्ती वेतन बंद करायचे आहे, असे सांगत शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बोलावले. दरम्यान, अनिरुध्द याची पूर्वीचीच ओळख असल्यामुळे दत्ता हे त्या ठिकाणी गेले असता अनिरुध्द याने दत्ता यांना कारमधे ढकलून आत बसविले. त्यानंतर कार भरधाव वेगाने नांदेडकडे पळवली. यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवून शांत केले. त्यांना नांदेड येथे नेल्यानंतर अनिरुध्द याने दत्ता यांचा मोबाईल घेऊन फोनपे वरून २० हजार रुपये त्याच्या खात्यात वळते करून घेतले. त्यानंतर दत्ता यांना मारहाण करून आणखी ५० हजार रुपये त्यांच्या पत्नीकडून फोन पे वर मागवून घेण्यास भाग पाडले. दत्ता यांच्या पत्नीने पाठविलेले ५० हजार रुपये अनिरुध्द याने त्याच्या खात्यावर वळते करून घेतले. त्यानंतर त्यांना सावरखेडा (ता. हिंगोली) शिवारात आणून सोडले. या घटनेमध्ये जखमी झालेले दत्ता उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर आज हिंगोली शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अनिरुध्द उर्फ अनिकेत पांढरे (रा. नांदेड), आकाश लाटकर, कृष्णा मस्के यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक गंधकवाड, जमादार अशोक धामणे, राखोंडे, संजय मार्के, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SWDqu5l
समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्याचे अपहरण:70 हजार ट्रान्सफर करून घेतले, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
March 07, 2025
0