शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर स्वतःची तुलना केल्याचा आरोप करत परब यांनी माफी मागावी या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शुक्रवारी विधान परिषदेत गोंधळ घातला. या वेळी मंत्री नितेश राणे यांनी परब यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनीही घोषणाबाजी केली. सभापती राम शिंदे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गदारोळ वाढल्याने सभापतींनी तीन वेळा सभागृह तहकूब केले. दरम्यान, या वादात अनेकांनी दोघांना शांत करण्याचे प्रयत्न केले. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ करण्यात आला : अनिल परब परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला तसा माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. ईडी, सीबीआयच्या नोटिसा मला पाठवण्यात आल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाला होता. शुक्रवारी परिषदेचे कामकाज सुरू होताच मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी परब यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी लावून धरली. राणे कुटुंबाच्या नावावर चार खून असल्याचा परबांचा दावा परब म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज माझे दैवत आहेत. माझे विधान हे नीट तपासा. काही चुकीचे बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार सभापतींना आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी झालेल्या प्रयत्नांविषयी बोललो. माझ्यावरही पक्षांतरासाठी टाकण्यात आलेल्या दबावावर भाष्य केले. मात्र, कोणीही उठतो आणि काहीही बोलतो. आज यांच्या (राणे कुटुंबाच्या) नावावर चार-चार खून आहेत. आता हे लोक आम्हाला शिकवणार का? हे लोक खुनी आहेत. तुम्ही नेहमी मातोश्रीची फरशी चाटण्याचे काम केले : राणे आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे पाडली. केंद्रीय मंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्याचा छळ कसा होईल ? कारकुणाचा कुणी छळ करू शकत नाही. जैसी करणी वैसी भरणी आहे. तुम्ही मातोश्रीची फरशी चाटण्याचे काम केले, असा आरोप केला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी घोषणाबाजी केली. अंबादास दानवेंकडून दिलगिरी दोघांच्या वादामुळे सभागृहाचे काम तीन वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली, तर संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कामकाजातून संसदीय शब्द वगळण्याची सूचना करत वाद मिटवण्याचे आवाहन केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hMUVqBn
छत्रपती संभाजी महाराजांशी परबांनी स्वत:ची तुलना केल्याचा आरोप:विधान परिषदेत राडा, राणेंशी वाद, सभापती शिंदेंनी हस्तक्षेप करून दाेघांना केले शांत
March 07, 2025
0