Type Here to Get Search Results !

विधान परिषदेत महापुरुषांच्या बदनामीवरून गदारोळ:​​​​​​​शिवरायांविरुद्ध लिहिणाऱ्या नेहरूंचा मविआ निषेध करणार का?- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध सर्वाधिक लिखाण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले आहे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात केला. आ. अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी व्यक्त केलेल्या प्रेमाचे पडसाद बुधवारीही उमटले. आझमींच्या निलंबनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या प्रशांत कोरटकर, सोलापूरकरला सरकार संरक्षण का देत आहे, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, कोरटकर तर चिल्लर आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध नेहरूंनी सर्वाधिक लिखाण केले आहे. त्यांच्या निषेधाची हिंमत मविआत आहे का? फडणवीसांच्या या सवालावर जोरदार घोषणाबाजी झाली. सभापती राम शिंदेंनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. जितेंद्र आव्हाड महाराजांविषयी जे बोलले त्याचे काय? विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. आम्ही १०० टक्के त्यांना जेलमध्ये टाकू. कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर मी वरच्या कोर्टात जायला सांगितले आहे. पण आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलले आहेत? त्याचा कधी निषेध केला नाही तुम्ही. आव्हाड म्हणतात औरंगजेब बलाढ्य होता, महाराज पाच फुटांचे होते, असे ते म्हणाल्याचे रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध का केला जात नाही? पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? आहे का हिंमत? छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणाऱ्या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hluoywU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.