सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर वादग्रस्त टीका सुरू आहे. ठाकरे गटाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून पक्षाने सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली आहे. पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सोशल मीडिया पेजेसच्या विरोधात सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरवणाऱ्या या सोशल मीडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी मागणी केली आहे. याबाबत पक्षाच्या वतीने ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर 'Fashiv Sena' या पेजवरून ठाकरे गटावर वादग्रस्त टीका केली जात आहे. या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या पेजवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो मॉर्फ करून वेगवेगळी माहिती शेअर केली जात असल्याचा आरोप साईनाथ दुर्गे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. ट्विटमध्ये आणखी काय म्हटले? महाराष्ट्रात ईव्हीएमच्या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवली, तरी सत्ताधाऱ्यांच्या कुरघोड्या कमी होत नाहीयेत. जनहित साधायचे सोडून, सोशल मीडियाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अपप्रचार, पक्षाच्या विचारसरणीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केली जातेय. ह्याविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव साईनाथ दुर्गे ह्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली. अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या ह्या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ह्या तक्रारीत केली. असे ट्विट पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66, कलम 66 अ, आणि कलम 67 चे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. सदर अकाउंटद्वारे भारतीय कायद्याचे उल्लंघन करून अपमानास्पद, बदनामीकारक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी सामग्री प्रसारित केली जात आहे, जी राष्ट्रीय एकात्मतेस गंभीर धोका निर्माण करू शकते, असेही तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/LIBEzVG
सोशल मीडियावर ठाकरे गटावर वादग्रस्त टीका:पक्षाची सायबर गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार, पेजवर बंदी घालून कारवाईची मागणी
March 15, 2025
0