मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यात फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी नवीन धरण गेल्या दहा वर्षांत बांधलेले नाही. तर गारगाई धरण, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प कागदावरच असून पुढील किमान पाच-सहा वर्षे मुंबईला उन्हाळ्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत मिळून ५ लाख ६६ हजार ५९९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते आहे. मनपाचे बोट पाणी गळतीकडे : मनपा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, लोकसंख्येनुसार पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच पाणीगळतीचे प्रमाणही कमी करण्याची गरज आहे. एक प्रकल्प रोखला होता मविआच्या काळात गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे मविआ सरकारच्या काळात मनपाने तो बाजूला ठेवला होता. दुसरीकडे समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणारा प्रकल्पही निविदेच्या पातळीवरच आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2fSYEVn
मुंबईसाठीच्या सातही धरणांत 33%साठा, टंचाईचे संकट:नव्या जल प्रकल्प उभारणीकडे सरकारचे दुर्लक्ष
April 07, 2025
0