सातारा जिल्ह्यात वडूज-दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या वाहनांच्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन मित्र ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघाताची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यासंदर्भातील माहिती अशी की, सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी-वडूज रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरानजीक स्वीफ्ट गाडी (एचएच 03 डीए 7354) ही प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता. प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने भरधाव गाडी चालवून त्याच्यासमोर असणाऱ्या ओमनीस (एचएच 14 डीएन 2758) पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर दहिवडीकडून वडूज जाणाऱ्या पिकअप गाडीला (एचएच 11 सीएच 3342) समोरुन जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौरमोडे (दोन्ही रा. औंध), तसेच पिकअप गाडीमधील लालासाहेब परशुराम पाटोळे, ज्योती लालासाहेब पाटोळे (दोन्ही रा.दरुज), ओमनी गाडीमधील रोहन आप्पासाहेब भीसे व आकाश सोनबा बर्गे (रा. वडुज) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह अपघात स्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी सातारला पाठवले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सदर अपघाताची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली. अपघातात दोन मित्रांचा मृत्यू या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे. तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही मित्र होते. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा आठवडा बाजार रद्द केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eaYVjOu
वडूज-दहिवडी रस्त्यावर तिहेरी अपघात:स्विफ्ट कार ओमिनीला धडकत पिकअपवर आदळली; दोन मित्रांचा मृत्यू, 6 जखमी
April 08, 2025
0