एका जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लाच मागितल्यानंतर व्यावसायिकाने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दिली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता. तक्रार अर्जाची पडताळणी करण्यात आल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील, भूकरमापक किरण येटोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल अष्टेकर (४१, रा. शिवाजीनगर, पुणे) या व्यावसायिकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर, पुणे येथील सर्व्हे नं. १८१/३, १८१/४अ, १८१/६ व १८१/९/१ ची मिळकतीची सन २०२३ व सन २०२४ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडून शासकीय शुल्क भरुन कायदेशीर रीतसर पद्धतीने मोजणी करुन घेतली होती. २०२३ पासून ते याकामी पाठपुरावा करत होते. मात्र, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील आणि किरण येटोळे यांनी जून २०२४ मध्ये संबंधित कामासाठी ५० लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत तक्रार केली होती. खात्यांतर्गत चौकशीत आढळले दोषी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी खात्यांतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. तपासात दोन्ही आरोपींनी शासकीय नोकर असतानादेखील तक्रारदाराचे मोठे नुकसान होण्याच्या उद्देशाने चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qR0oTOS
पन्न्नास लाख लाच मागणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा:पुण्यातील व्यावसायिकाची थेट मंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार
April 19, 2025
0