अकोल्यातील सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने बुधवारी (१४ मे) धाड टाकली होती. त्यानंतर, शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने नागपुरातील हवाला व्यावसायिक शैलेश लखोटिया व सराफा व्यावसायिक पुरुषोत्तम कावळे यांच्या प्रतिष्ठानांवर धाड टाकली असून कारवाई सुरू आहे. ईडीचे पथक गुरुवारीच नागपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी या पथकाने ईडीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन धाडसत्र सुरू केले. पुरुषोत्तम कावळे यांच्या इतवारीतील सागर ज्वेलर्सवर छापा कारवाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी डीआरआयने केलेल्या कारवाईमुळे कावळे चर्चेत आले होते. नागपूर शहरातील एका सराफा व्यावसायिकासोबत ईडीने कावळेला कोलकाता येथे सोन्याच्या तस्करी प्रकरणात पकडले होते. दुसरा सराफा व्यावसायिक जुगाड करून वाचला होता, तर कावळे डीआरआयच्या कोठडीत होते. ईडीचे पथक गांधीसागर, इंदिरानगरजवळ असलेल्या सदनिकेत पोहोचले व त्यांना चौकशी करण्यासाठी घेऊन गेले. दुसरीकडे, ईडीने हवालाचा सर्वात मोठा व्यापारी असलेल्या शैलेश लखोटिया याचे घर व कार्यालयावर धाड टाकली. हवालात गुंतलेल्या शैलेश लखोटियाच्या दोन भावांची दरोडेखोरांनी २००७-०८ मध्ये निर्घृण हत्या केली होती. शैलेश लखोटिया ऑनलाइन सट्टा चालवत असल्याचा संशय ईडीला आहे. १४ मे रोजी आयकर विभागाने कोट्यवधींची करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून अकोल्यातील चार सराफा दुकानांवर धाड टाकली होती. दरम्यान, ईडीचे अधिकारी संबंधिताची कसून चौकशी करत असून यातून आणखी मोठे काही तरी मोठे घबाड हाती लागेल, असे सांगण्यात आले. करचुकवेगिरी करणाऱ्या १७ प्रतिष्ठानांवर कारवाई नंदकिशोर अलीमचंदानी यांचे पूनम ज्वेलर्स व प्रकाश ज्वेलर्स, राजेश अटलानी यांचे एकता ज्वेलर्स व प्रकाश लोधिया (जैन) यांचे ईशा ज्वेलर्स या संपूर्ण ग्रुपवर धाड टाकण्यात आली. या ज्वेलर्सच्या अमरावती, यवतमाळ, परतवाडा येथील एकूण १७ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JGMzAQa
सोने तस्करीत सापडले होते सराफा व्यावसायिक:नागपूरच्या व्यावसायिकावर ईडीची धाड, चौकशी सुरूच
May 23, 2025
0