Type Here to Get Search Results !

शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची तब्येत बिघडली:चक्कर येणे, उलटीचा त्रास, उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हृदयाचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात तानाजी सावंत यांना दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपाचारांमुळे तानाजी सावंत यांची प्रकृती थोडी स्थिर होत असल्याचे सांगितले जात आहे. उद्या तानाजी सावंत यांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. तूर्तास तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात प्रथम त्यांची आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तपासणी केली व त्यांना पुढील उपचार व निरीक्षणासाठी रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट आणि सहकारी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या त्रास होण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या देखील करण्यात येत आहेत. रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सावंत यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाकडून योग्य ते उपचार व देखरेख करण्यात येत आहे. मुलाला परत आणण्यासाठी यंत्रणा लावली होती कामाला दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी तानाजी सावंत यांनी बँकॉकला निघालेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली होती. तेव्हा त्यांच्यासह सरकारवर टीका झाली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. शिवसेना शिंदे गटाचे मोठे नेते म्हणून तानाजी सावंत परिचित आहेत. तानाजी सावंत मोठे व्यवसायिक असून, त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AtdCgK7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.