ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. त्यांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित होणाऱ्या महसूल सप्ताहाबाबत बावनकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर लागत होता, आता याची आवश्यकता राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांसह लाभार्थ्यांना महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच उत्कृष्ट निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात येणार आहे. दोन अपिलांनंतर ३ ऑगस्ट रोजी रस्ता वादावर निर्णय शेतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या पांदण / शिवपांदण रस्त्यांचे वाद वर्षानुवर्षे सुरू राहतात. हे वाद मिटविण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत आहे. यानुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्यास्तरावर दोन अपिल होऊन ३ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय होईल. त्यानंतर शेताच्या बांधावर १२ फुटांचा रस्ता तयार करुन त्यांना क्रमांक दिले जातील. या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लागवड केली जाईल. ही झाडे तोडल्यास वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RdUfYGE
राज्यातील प्रत्येक शेताला 12 फूट रस्ता उपलब्ध करून देणार:राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी कुटुंबाना मालमत्तापत्र देणार- बावनकुळे
July 30, 2025
0