जायकवाडी धरणातून गुरुवारी (३१ जुलै) पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले जाणार आहे. धरणातून ९४३२ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे. यामध्ये नांदूर-मधमेश्वरमधून १२६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीत ५० टीएमसी पाणी जायकवाडी धरणात १ जून रोजी २९ टक्के पाणीसाठा होता. सध्या ९०.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक आणि नगरमधून जायकवाडीत आत्तापर्यंत ५०.४५ टीएमसी पाणी आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. मात्र, आठवडाभरातच पाऊस झाल्यामुळे डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते. गेल्या वर्षी ९ सप्टेंबर २०२४ रोजी जायकवाडीतून पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जायकवाडीचे पाणी सोडले जाणार असल्याने गोदावरी नदी पात्राच्या दुतर्फा असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/lXcFJ3L
1979 नंतर पहिल्यांदाच जुलैमध्ये जायकवाडीतून पाणी सुटणार:जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे आज अर्ध्या फुटाने उघडले जाणार
July 30, 2025
0