बुद्धिबळ विश्वात भारताचे नाव उज्ज्वल करणारी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आज रात्री नागपुरात परतली. यावेळी नागपूर विमानतळावर तिचे ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. फिडे महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये (FIDE Women’s World Championship) वर्ल्ड चॅम्पियनचा मान पटकावून परतलेल्या दिव्याच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी (२९ जुलै) जॉर्जियामधील बाटुमी येथे झालेल्या अंतिम सामन्यात दिव्याने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या यशानंतर ती आज रात्री नागपूरमध्ये परतली. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर तिच्या स्वागतासाठी नागपूरकर आणि चेस फेडरेशनने जय्यत तयारी केली होती. दिव्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, विशेषतः बुद्धिबळ खेळणारी शाळकरी मुले आणि लहान मुली जमल्या होत्या. दिव्याच्या स्वागतासाठी तिचे वडील आणि आजी देखील उपस्थित होते. दिव्या विमानतळावर पोहोचताच सारा परिसर जल्लोषमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी दिव्याला ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात विमानतळाबाहेर नेण्यात आले. विमानतळापासून तिच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. दिव्या भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली 19 वर्षीय दिव्याने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विजयासोबत ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखला व्हिडिओ कॉल करत तिचे कौतुक केले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील दिव्याचा भव्य सत्कार केला जाणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bMLG3AZ
बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपुरात दाखल:विमानतळावर जल्लोषात स्वागत, वडील आणि आजीची उपस्थिती
July 30, 2025
0