शासनाने अचानक करवाढ केल्यामुळे अमरावती शहरातील २४ बार बंद झाले आहेत. दरम्यान शासनाच्या जाचक धोरणाचा निषेध करण्यासाठी आज, सोमवारी शहरातील बार व्यावसायिकांनी जिल्हा कचेरीवर धरणे दिले. अमरावती डिस्ट्रीक्ट परमिट रुम असोसिएशनच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष नितीन मोहोड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शासनाने यावर्षी परमिट रुमच्या शुल्कात १५ टक्के वाढ केली आहे. १० टक्के वॅट त्यांना आधीच भरावा लागतो. याशिवाय ५० टक्के मद्यांवरही अतिरिक्त कर लादण्यात आला आहे. त्यामुळे या व्यवसायाचे कंबरडेच मोडले असून तो बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. कर वाढीमुळे शुल्काची एकूण रक्कम एक कोटीच्या वर पोहोचली असून ती अदा करणे सर्वांना शक्य नाही. त्यामुळेच शहरातील २४ बार बंद झाले असून त्यात काम करणारे व्यवस्थापक, कूक, वेटर असे शेकडो नागरिक रोजगारविहिन झाले आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार टिकून रहावा व बारच्या संचालकांनाही आपला व्यवसाय शाबूत राखता यावा, यासाठी करवाढ रद्द करावी, अशी या असोसिएशनची मागणी आहे. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर करण्यात आले. दरम्यान हे निवेदन शासनदरबारी पाठवून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले. आंदोलनात अध्यक्ष नितीन मोहोड यांच्याशिवाय उपाध्यक्ष अनिल तरडेजा व सूर्यकांत जयस्वाल, सचिव आशिष देशमुख, देशी-विदेशी मद्य व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष अंगद देशमुख, उपाध्यक्ष विजय जयस्वाल, परमीट रुम असोसिएशनचे शहराध्यक्ष गजानन राजगुरे, उपाध्यक्ष लाठी नंदा, सचिव सुरेश चांदवानी व मदन जयस्वाल आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3fBRMtU
मद्य विक्रीवरील कर वाढीचा विरोध:अमरावतीत 24 बार बंद; बारचालकांची जिल्हा कचेरीवर निदर्शने, शुल्क परत घेण्याची मागणी
July 15, 2025
0