जुळे सोलापूर भागातील म्हाडा कॉलनीतील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. शिवशरण भुताळी तळकोटी (रा. ससाणे काॅलनी, केशवनगर, पुणे. सध्या राहणार म्हाडा काॅलनी, जुळे सोलापूर) असे मृताचे नाव आहे. आतापर्यंत पुण्यातील कोंढवा येथे शिक्षण घेतलेल्या शिवशरणला दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील एका खासगी शिक्षण संस्थेत जेमतेम वेतनावर काम करत होते. तर तीन महिन्यांपूर्वी आईचे काविळीच्या आजाराने निधन झाले होते. मुलगा हुशार होता. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे मातृछत्र हरवलेल्या शिवशरणला मामाने पुढील शिक्षणासाठी आपल्याकडे आणले. जुळे सोलापुरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात त्याला प्रवेश दिला. खासगी कोचिंग क्लासेसही लावले. आईच्या प्रेमाला पारखा झालेला शिवशरण मात्र मानसिक तणावात होता. यातूनच त्याने बुधवारी दुपारी मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आपल्या मृत्यूला कुणालाही दोषी धरू नये, असे नमूद केले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे. म्हाडा कॉलनीतील स्थानिकांच्या माहितीनुसार, शिवशरण रोज पहाटे शिकवणीला जाताना दिसायचा. तो नियमित अभ्यास करत होता. तो राहत असलेल्या घरात दोन मुले होती. त्याचे मामा अक्कलकोट येथे नोकरीच्या निमित्ताने तेथे राहत होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मामा तोळनूर सर यांच्याशी फोनवर बोलला. अभ्यास चांगला सुरू असल्याचे सांगितले. मात्र दुपारी त्याने घरातच फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शिवशरणच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. हे सर्व जण पुण्यात असतात. शिवशरणची सुसाइड नोट त्याच्याच शब्दात... मामा तू माझ्यासाठी खूप केलंस, मी गेल्यावर बहिणीला सुखात ठेव ‘मी शिवशरण. आज मी मरत आहे.. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते, पण मी गेलो नाही. कारण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस? माझ्याकडे ये..’ असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा.... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस. त्याबद्दल धन्यवाद. - तुमचा पिंट्या (माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/u1UCKN9
सोलापुरातील हदयद्रावक घटना:‘आई स्वप्नात म्हणाली, माझ्याकडे ये...!’ विद्यार्थ्याची आत्महत्या, दहावीला शिवशरणला 92 टक्के गुण, ‘नीट’ देऊन डॉक्टर बनायचे होते स्वप्न
July 23, 2025
0