Type Here to Get Search Results !

निवडणुकीच्या तोंडावर पुण्याची मेट्रो बिहारला पाठवली:पाटणा मेट्रोसाठी पुण्याची राखीव गाडी तीन वर्षांच्या भाडेकरारावर; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

पुणे मेट्रोची एक राखीव गाडी बिहारमधील पाटणा मेट्रोसाठी भाडेतत्वावर पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्याने मतदारांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी तीन वर्षांच्या भाडेकरारावर पाठवला आहे. सध्या ही ट्रेन बिहारमधील गीतागड येथील डेपोत आहे. आबनावे यांनी सांगितले की पुणे शहरात दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोचा वापर करतात. वाढत्या गर्दीमुळे गाड्यांची वारंवारिता वाढवणे आवश्यक आहे. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकांसाठी राखीव गाड्यांची उपलब्धता महत्त्वाची आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधींना विश्वासात घेतले का? तसेच भाडेकराराच्या अटी काय आहेत, पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी येणार आहे आणि बिहारला दिलेली मेट्रो ट्रेन परत येणार आहे का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. युवक काँग्रेसने या प्रकरणी मेट्रो गाडी तात्काळ पुण्यात परत न आणल्यास महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आबनावे यांच्या मते, पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण असताना आणि प्रवासीसंख्या वाढत असताना ही मेट्रो बिहारला पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6x0Makz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.