विदयार्थी हिताच्या कल्याणकारी योजना, विविध शिष्यवृत्ती व सांस्कृतिक उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्यात येणार आहेे. तसे आदेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रशासनाने प्रत्येक महाविद्यालयाला दिले आहेत. विद्यार्थी संवर्गामधून अधीसभेवर निवडून गेलेले प्रा. डॉ. नितीन टाले यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला होता. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना व शिष्यवृत्तीची तरतूद विद्यार्थ्यांकरता केली जाते. त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद विद्यापीठ अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. परंतु या योजना प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्याकरिता विद्यार्थी कक्ष असावा, असा प्रस्ताव डॉ. टाले यांनी गेल्यावेळी अधीसभेसमोर ठेवला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाल्यामुळे यावर्षीपासून सदर प्रस्तावाची अंमलबजावणी केली जात आहे. हा महत्वपूर्ण प्रस्ताव विद्यापीठ विनिमय १९/२०२२ नुसार आता आदेशात रुपांतरीत झाला असून तशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. मुळात प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी कक्ष स्थापन करण्याची तरतूद होती. परंतु याबाबत महाविद्यालयांचे धोरण उदासिन होते. असंख्य महाविद्यालयात विद्यार्थी कक्षाची स्थापनाच करण्यात आली नाही, हे सिनेट सदस्य डॉ नितीन टाले यांनी अधीसभेत सोदाहरण सिद्ध केले होते. त्यामुळे सदर निर्णय करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. अशी असेल कक्षाची रचनादरम्यान प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करून त्याबाबतची माहिती तातडीने विद्यापीठास देण्याचे आदेश कुलगुरूंनी महाविद्यालयांना दिले आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी विकास कक्ष निर्माण करण्यात येईल. त्याच्या प्रमुख पदी उपप्राचार्य किंवा प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेले प्राध्यापक असतील. या कक्षाच्या सदस्यांमध्ये एक अध्यापक, महिला अध्यापक, सामाजिक कार्यकर्ता, समुपदेशक तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतील. विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे सर्व स्तरातील गरजू विद्यार्थ्यांकरिता विविध योजना निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तेवढी तरतूदही करण्यात आलेली आहे. या योजनांचा लाभ गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थी विकास कक्षामुळे या योजना अधिक सुलभपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितपणे सहाय्य होईल- प्रा. डॉ. नितीन टाले
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/k3TdYFv
विद्यार्थी कल्याणासाठी महत्त्वाचा निर्णय:अमरावती विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांत विद्यार्थी विकास कक्ष स्थापन होणार
July 13, 2025
0