हिंदी सक्तीविरोधातील यशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारपासून इगतपुरी येथे मनसेचे तीनदिवसीय शिबीर होणार आहे. मात्र, शिबिर कुठे होणार, याची गुप्तता पाळली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शनिवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस, शहरप्रमुख आणि विभाग अध्यक्षांना फर्मान जारी केले. सोमवारी सकाळी १० वाजता ‘कपड्यांची बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर राहा’, त्यानंतर दोन दिवसांसाठी मुंबईच्या बाहेर कार्यशाळेसाठी जायचे असून, याबद्दल कुठेही बोलू नये, अशी तंबीही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी ते बुधवार (१४ ते १६ जुलै) इगतपुरी येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत आगामी निवडणूक रणनीती, मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे, पक्षशिस्त आणि संघटन बळकटी यावर राज ठाकरे थेट मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे राज ठाकरे यांनी नेते पदाधिकाऱ्यांना तीन दिवसांच्या तयारीसह येण्यास सांगितले आहे. पक्षाच्या उभारणीसाठी कार्यशाळा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. मनसेने पुकारलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही मैदानात उतरला होता. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर आले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी नेते व पदाधिकारी यांना सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवर मतप्रदर्शन करु नये, अशी ताकीद दिली होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/L31f5tg
सोमवारपासून इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवसीय शिबिर होणार:राज ठाकरेंचे नेते, पदाधिकाऱ्यांना फर्मान, ‘कपड्यांची बॅग घेऊन या’
July 12, 2025
0