Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात, सागर धसविरोधात गुन्हा दाखल:आमदार धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून, दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवारी (७ जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन प्रकाश शेळके (३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. धस यांचा मुलगा सागर सोमवारी (७ जुलै) रात्री पुण्याहून नगरकडे आपल्या आलिशान कारने (एमएच २३, २९२९) येत होता. नितीन शेळके यांचे जातेगाव फाट्यावर हॉटेल सह्याद्री असून हॉटेलवरून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर (एमएच १६ डीजे ३७६५) ते पळवे खुर्द येथील घरी जात होते. नगर-पुणे रस्ता ओलांडताना, भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. त्यात कारखाली चिरडल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नितीन यांचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ नितीन यांची वाट पाहत होते. अपघाताची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले असता, नितीन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ जखमी नितीन यांना रस्त्याच्या बाजूला घेतले. चुलतभाऊ अमोल शेळके, सतीश शेळके, नीलेश शेळके यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी सर्व जण आल्यानंतर त्यांनी जखमी नितीन यांना सुपा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नितीन यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरिय तपासणीनंतर मंगळवारी (८ जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास नितीन यांच्यावर गावी पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातानंतर सागर धस स्वत: पोलिस ठाण्यात अपघाताच्या घटनेनंतर सागर धसने स्वत:च सुपा पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यानंतर स्वप्निल व त्यांचे भाऊ सुपा पोलिस ठाण्यात गेले असता, नितीन व स्वप्निल यांचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे पोहोचले त्यावेळी सागर धस पोलिस ठाण्यातच होते. त्यानंतर सुपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/farRUPd

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.