Type Here to Get Search Results !

माझ्या परवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधू नका:सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका, मीरा रोड मोर्चानंतर राज ठाकरेंचा पदाधिकऱ्यांना स्पष्ट आदेश

मुंबईत सध्या मराठी-अमराठी वाद सुरू असून, याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आणि कोणतीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी, असेही राज ठाकरे यांनी आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात आलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर पोलिसांच्या विरोधाला झुगारुन मनसेने हा मोर्चा काढला आणि आंदोलन यशस्वी केले. आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद न साधण्याचे आदेश दिले. राज ठाकरे यांचा आदेश काय? एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. राज ठाकरे । राज ठाकरे मिरा रोडला भेट देण्याची शक्यता दरम्यान, मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या मनसेविरोधात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी 8 जुलै रोजी मीरारोड येथे मनसे, ठाकरे गटाची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला. मात्र, मोर्चादरम्यान अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते, तसेच काही मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील झाली होती. या मोर्चानंतर राज ठाकरे लवकरच मीरा रोड येथे भेट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात मतमतांतरे, फडणवीसांकडून पोलिसांना जाब दरम्यान, मीरा रोड येथील मोर्च्याच्या परवानगीवरून शिंदे गटातील नेत्यांमध्येही सकाळपासून मतमतांतरे दिसून आलेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोर्च्याला परवानगी नाकारण्याचे स्पष्टीकरण दिले, तर आमदार प्रताप सरनाईक यांनी “मराठी माणसांच्या मोर्च्याला परवानगी का नाकारली गेली?” असा थेट सवाल उपस्थित केला. तर या मोर्चाला परवानगी का नाकारली? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस महासंचालकांना जाब विचारला असून, परवानगी नाकारून पोलिसांना बदनाम करण्याचा हेतू होता का? याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे ही वाचा... हिंमत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा:आणखी एका खासदाराचे राज ठाकरेंना थेट आव्हान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने "महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी बोललीच पाहिजे" असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच भूमिकेवरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिले होते. त्यानंतर आता हिंमत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हान समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी राज ठाकरेंना दिले आहे. पूर्ण बातमी वाचा...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/nLloR1W

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.