सत्ताधारी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कानउघाडणी केली आहे. काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावे लागले. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा गंभीर इशारा शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला. गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या काही नेत्यांचे कारनामे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, तर मंत्री संजय शिरसाट यांच्या बॅगेतून रोख रक्कम असल्याचा व्हिडीओ समोर आला. यामुळे विरोधक आणि घटकपक्षांकडूनही शिंदे यांच्या पक्षाला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी आज सावकर स्मारक येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्वपक्षीय मंत्री आणि आमदारांची कानउघडणी करीत निर्वाणीचा इशारा दिला. काय म्हणाले एकनाथ शिंदे? गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या, तुमच्याकडे दाखवलेले बोट माझ्याकडे असते. तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारला जातो. तुम्ही सगळी माझी माणसे आहात. आपले कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागले, असे म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे. कारवाई करायला मला आवडणार नाही पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करावी लागणार नाही, तसेच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखे वागत नाही. कार्यकर्त्यासारखे वागतो. तुम्हीही तसेच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदे मिळाली तरी कार्यकर्ता आहे, असेच समजून कामे करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला. बदनामीचे डाव रचले जात आहेत, काळजी घ्या आपल्या पक्षाला कमी वेळात जास्त यश मिळाले आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळेच बदनामीचे डाव रचले जात आहेत. अशावेळी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या असे सांगतानाच बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागले. याचे भाव ठेवा असा अप्रत्यक्ष इशाराही शिंदे यांनी दिला. अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल यापुढे कोणाचीही चूक खपवून घेतली जाणार नाही. मंत्री आणि आमदारांनीही जबाबरीने वागावे अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Y0vzZl5
मंत्री-आमदारांच्या प्रतापांमुळे एकनाथ शिंदे संतप्त:जबाबरीने वागा अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल; शिवसेनेच्या मंत्र्यांना स्पष्ट इशारा
July 14, 2025
0