मिरा-भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी भाषेच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी या भागात सभा घेणार आहेत. यासंदर्भात मनसेकडून पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. अलीकडे मिरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता. “मराठी शिकणार नाही” असे म्हणत संबंधित मनसे कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अमराठी व्यापऱ्यांनी केली होती. त्याला उत्तर म्हणून मंगळवारी 8 जुलै रोजी मनसे व मराठी जनतेने भव्य मोर्चा काढला होता. यात शिवसेना ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते सामील झाले होते. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिली होती, तर त्याच वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणाऱ्या मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, मराठी जनतेच्या संतप्त भावना लक्षात घेता अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि मराठी मोर्चालाही परवानगी दिली. याचदरम्यान, पोलिसांकडून मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली. मराठी हितासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या पोलिसांच्या कारवाईवरही टीका झाली. या पार्श्वभूमीवर आता मीरा भाईंदर येथील मराठी जनतेचे आभार मानायला राज ठाकरे सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. सभेची तारीख आणि वेळ राज ठाकरे हे 18 जुलै रोजी मिरा-भाईंदरमध्ये दौरा करणार असून, त्यांच्या सभेचही आयोजन करण्यात आले आहे. ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार असून, ज्याठिकाणी व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला होता, त्याच भागात ही सभा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा... विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही:राज ठाकरेंचे विधान, म्हणाले - युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे. पूर्ण बातमी वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MA08rn5
राज ठाकरेंची तोफ मिरा भाईंदरमध्ये धडाडणार!:व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणी होणार सभा, तारीख आणि वेळ जाहीर
July 16, 2025
0