हिंगोली शहरात एका व्यक्तीच्या व्हॉटस् अॅपवर विवाह सोहळ्याची एपीके फाईल पाठविल्यानंतर फाईल ओपन करताच सायबर भामट्याने दोन व्यक्तीच्या बँक खात्यातून १.९१ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळती करून घेतल्याच्या प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर भागातील मधूकर राऊत यांच्या मोबाईलच्या व्हॉटसअपवर विवाह सोहळ्याची एपीके फाईल पाठविली होती. त्यानंतर राऊत यांनी सदर फाईल ओपन केल्यानंतर त्यात काहीही दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सदर फाईल ओपन झाल्याचे भामट्याला लक्षात आल्यानंतर त्याने राऊत व त्यांचे सहकारी पाटील यांच्या बँक खात्यातून १.९१ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतली. दरम्यान, आज सकाळी बँक खात्यातून पैसे वळविण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर राऊत घाबरून गेले. त्यांनी तातडीने बँकेला माहिती दिली तसेच ऑनलाईन देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर सेल विभागाकडेही तक्रार केली अाहे. त्यानंतर त्यांच्या रकमेला होल्ड लावण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांनी आज रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, संतोष करे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, गणेश वाबळे यांच्या पथकाने तपास सुरु केला असून यासाठी सायबर सेल विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/y4cNIem
हिंगोलीत एपीके फाईल उघडणे पडले महागात:भामट्याने बँक खात्यातून 1.19 लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
August 20, 2025
0