निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत मतचोरी केली, असा आरोप राहुल गांधी सतत करत आहेत. त्यांची बिहारमध्ये याच मुद्द्यावर यात्राही सुरू आहे. मतचोरीच्या आरोपासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीही सादर केली. असेच आकडे सीएसडीएस या संस्थेनेही काही महिन्यांपूर्वी दिले होते. पण ते आकडे चुकीचे असल्याची प्रामाणिक कबुली सीएसडीएसच्या प्रमुखांनी नुकतीच दिली आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी राहुल यांच्या आरोपाला पाठिंबा दिला. महाराष्ट्र विधानसभेपूर्वी दोन जण मला भेटले. त्यांनी १६० जागांची हमी दिली होती. मी त्या दोघांना राहुलना भेटवले होते, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली. १६० जागांची हमी देणाऱ्या त्या दोघांचे नाव, पत्ते मला माहिती नाही, असेही ते म्हणाले होते. या निमित्ताने २३ मार्च २०१४ रोजी खुद्द शरद पवारांनीच जाहीर सभेत केलेल्या आवाहनाची प्रकर्षाने आठवण होते. त्यात पवारांनीच लोकांना बोटाची शाई पुसून दोन ठिकाणी मतदान करण्याचे अावाहन केले होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने तंबी दिली हाेती. यापुढे बोलताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या, असे आयोगाने बजावले होते. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात (एपीएमसी) आयोजित माथाडी कामगारांच्या एका मेळाव्यात बोलताना पवारांनी हा लोकशाहीला पायाखाली तुडवणारा सल्ला दिला होता. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पवारांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे आयोगाने म्हटले होते. मात्र, याबद्दल पवारांनी नंतर खेद व्यक्त केल्याने यावर पुढे कारवाई न करता हे प्रकरण आयोगाने केवळ दम देऊन मिटवले होते. पवारांना बजावताना आयोगाने म्हटले होते की, “आपण ज्येष्ठ नेते आणि एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात. त्यामुळे बोलताना किंवा आचरणातून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी’. २००९ मध्ये सातारा आणि मुंबई येथे एकाच दिवशी मतदान झाले होते. त्यामुळे मतदान चांगले झाले नाही. परंतु २०१४ मध्ये साताऱ्यात १७ एप्रिल तर मुंबईत २४ एप्रिल रोजी मतदान होते. या दोन टप्प्यांचा फायदा घेऊन लोकांनी दोन ठिकाणी मतदान करावे, असे खुलेआम आवाहन पवारांनी केले होते. “बोटावरील शाई पुसायला विसरू नका’ असे सांगत मतांची चोरी लपवण्याची चोरवाटही पवारांनीच मतदारांना त्या वेळी दाखवली होती. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यात बोगस मतदानाला चालना दिल्याचा खुलासा केल्यानंतर पवार यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांनी असेही म्हटले होते की ते “आपल्या काकांच्या बाजूने कोणतेही बोगस मतदान होणार नाही याची ते खात्री करतील असे धनंजय मुंडे म्हणाले होते.’ पवारांनी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाकडे राज्य पक्ष म्हणून मान्यता द्यावी, मतदान यंत्रावर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मोठे करावे आणि पिपाणी हटवावी, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत तत्कालीन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी सांगितले होते की, पवारांच्या पक्षाला राज्य पक्ष तसेच निधी स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे मतदान यंत्रावरील चिन्ह मोठ्या आकारात दिसेल अशी व्यवस्था केली जाईल. पवारांची तिसरी मागणी होती ट्रंपेट हटवण्याची. मात्र, तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रंपेट ही दोन्ही चिन्हे वेगळी दिसतात. त्यामुळे ते हटवता येणार नाही असे आयुक्तांनी सांगितले होते. दुसरीकडे १६० जागांची हमी देणाऱ्या दोघांना पवारांनी पोलिसांच्या ताब्यात देण्याएेवजी राहुल गांधींकडे नेले होते. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेल्या जाणत्या राजाने असे वागावे यातच ग्यानबाची मेख आहे, असा भाजपचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर असे म्हणणे आहे की, शरद पवारांनी १६० जागांच्या हमीवाल्या त्या दोन माणसांचा वापर करण्याचा प्रयत्न करून पाहिला काय? हा प्रश्न पवारांभोवती संशयाचे दाट धुके उभे करतो. पवार हेे धुके दूर कधी करतील, याची वाट महाराष्ट्र पाहत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FPvUxit
2014 मध्ये पवारांनी मतचोरीची चोरवाट खुलेआमपणे दाखवली:11 वर्षांपूर्वी शरद पवारच म्हणाले होते, बोटाची शाई पुसून दोन ठिकाणी मतदान करा
August 22, 2025
0