समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा दरोडेखोरांनी थैमान घालत व्यापाऱ्याच्या पावणे पाच किलो सोन्याचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सोनार व्यापाऱ्याला त्याच्याच चालकाने विश्वासघात करून दरोडेखोरांच्या तावडीत दिल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोळा सणाच्या सायंकाळी घडलेल्या या लुटमारीमुळे महामार्गाची सुरक्षितता आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अपघातांचे प्रमाण कमी झालेल्या महामार्गावर आता लुटमारीच्या घटना वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ही घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) हे खामगाव येथून मुंबईकडे सोन्याचा ऐवज घेऊन निघाले होते. त्यांनी भाड्याने घेतलेल्या इनोव्हा गाडीतून प्रवास सुरू केला होता. गुरुवारी (दि.२२ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फरदापूर टोलनाका ओलांडल्यानंतर चालकाने अचानक पोटदुखीचे कारण सांगून गाडी बाजूला उभी करण्यास सांगितले. व्यापाऱ्याने गाडी थांबविताच पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनातून चार ते पाच अज्ञात दरोडेखोर उतरले. त्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मिरचीपूड डोळ्यात फेकली. याच वेळी व्यापाऱ्याचा चालकानेच सोन्याने भरलेली बॅग उचलून थेट दरोडेखोरांच्या गाडीत बसकण घेतली. क्षणातच दरोडेखोरांनी आपली गाडी सुरू करून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पलायन केले. व्यापारी काही क्षणातच भांबावून गेला तर चालक आणि दरोडेखोर पावणे पाच किलो सोने घेऊन रफूचक्कर झाले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दरोडेखोरांची गाडी मालेगाव टोलनाका ओलांडून पातूरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. मात्र, पातूरच्या जंगलाजवळ दरोडेखोरांनी आपली गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाचा धागा पकडत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांच्या तपास पथकाने मालेगाव व पातूर परिसरात सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीदारांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून, समृद्धी महामार्गावर सुरक्षेची पुनर्रचना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mf7Sl1Z
समृद्धी महामार्गावर व्यापाराला लुटले:चालकानेच केला विश्वासघात, पावणेपाच किलो सोन्याचा ऐवज लंपास
August 22, 2025
0