पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी झालेल्या कार्यक्रमात माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सनातन संस्थेने प्रतिक्रिया दिली आहे. सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बोरवणकर यांना मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबईतील ७/११ रेल्वे बॉम्बस्फोट आणि दाभोलकर हत्या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. राजहंस यांनी म्हटले की, या घटना काँग्रेस सरकारच्या काळात घडल्या. दाभोलकर प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तपास सुरू होण्यापूर्वीच गोडसेवादी प्रवृत्तींकडे बोट दाखवले. एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर राजकीय दबाव होता असे बोरवणकर म्हणाल्या. त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील किंवा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता का हे स्पष्ट करावे. राजहंस यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरही टीका केली. त्यांनी म्हटले की या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत. आर. आर. पाटील यांच्या काळात या संघटनेचे नाव नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या संघटनांच्या यादीत होते. नुकतेच अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांना नक्षलवादी म्हणून अटक झाली. सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी अंनिसच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची शिफारस केली आहे. अशा संघटनेच्या व्यासपीठावर जाणे योग्य कि अयोग्य, हे कोणालाही वाटू शकते; पण याविषयीही ‘या कार्यक्रमासाठी जाऊ नये’, म्हणून मीरा बोरवणकर यांना २० फोन आले म्हणे, त्यात एक धमकीचा फोनही आला, असे त्या म्हणाल्या. माजी पोलिस आयुक्तांना धमकी आली, इतकी गंभीर घटना घडूनही एक साधी बातमी आली नाही. बोरवणकर यांनी याविषयी पोलिस तक्रार केली आहे ना? दाभोलकर प्रकरणातही हमीद दाभोलकर यांनी माझ्या वडिलांना ‘तुमचा गांधी करू’, अशी धमकी आल्याचा सनसनाटी आरोप करून वारेमाप प्रसिद्धी मिळवली होती. प्रत्यक्षात न्यायालयात याविषयी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही, त्याविषयी साधी पोलिस तक्रारही केलेली नाही, हे समोर आले. यातून जनतेने काय ते समजून घ्यावे, असे राजहंस म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/of013Lz
पोलिसांनी कोणत्याही विचारसरणीचे असू नये:मालेगाव, 7/11 प्रकरणातील राजकीय नेत्यांची नावे जाहीर करा, सनातन संस्थेची मीरा बोरवणकर यांना विनंती
August 23, 2025
0