Type Here to Get Search Results !

वाद चिघळला:पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या 3 तरुणींवरच गुन्हा दाखल, संभाजीनगरच्या बेपत्ता विवाहितेचे प्रकरण पुन्हा तापणार

छत्रपती संभाजीनगरहून बेपत्ता विवाहितेच्या तपासासाठी पोलिसांच्या पथकाने मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलेल्या तरुणींनीच बेशिस्त वर्तन केल्याचा गुन्हा सोमवारी ( १८ ऑगस्ट) बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. सरकारी कागदपत्रे फाडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने तेथील व कोथरूडच्या पोलिसांच्या मदतीने बेकायदा छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतल्याचा आरोप ४ ऑगस्टला करण्यात आला. तसेच, या तरुणींना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख शुजात आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) आमदार रोहित पवार व कार्यकर्त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. या तरुणींना शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वये कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. दरम्यान, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात पोलिसांनी मारहाण केल्याचे अथवा शिवीगाळ केल्याचे पुरावे आढळले नाहीत. मात्र, आंदोलकांनी शासकीय मालमत्ता असलेले पत्र फाडून, जबरदस्तीने पोलिस आयुक्तालयात घुसून घोषणा दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोरे यांनी फिर्याद नोंदवली असून त्यानुसार वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट, स्वप्निल वाघमारे, दत्त शेंडगे, ॲड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश भलाणे आणि अॅड. रेखा चौरे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत आमदार रोहित पवार यांनी पोलिसांवर टीका केली होती. “कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातिवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता? छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पीडित युवती कोण? या प्रकरणाशी संबंधित माजी पोलिस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? असे आणि इतर प्रश्न पवार यांनी उपस्थित केले होते. प्रत्यक्षात पुरावे न आल्याने पोलिसांविरुद्ध कारवाई नाही प्रत्यक्षात त्याबाबतचे पुरावे पुढे न आल्याने पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. मात्र, पोलिस आयुक्तालयात जबरदस्तीने घुसून अरेरावी करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आला. या आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेतेही सहभागी झाले होते. परिणामी, आता हे प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता कार्यकर्त्यांनी हे प्रकरण पुन्हा उचलून धरण्यासाठी पुढे काय करता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात येत आहे. एकूणच हे प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. विवाहितेला मदत केल्याने तरुणींना घेतले होते ताब्यात छत्रपती संभाजीनगर येथे घरगुती भांडणातून एक तरुण विवाहिता पुण्यात निघून आली होती. संभाजीनगर पोलिसांचे एक पथक या विवाहितेचा सासरा असलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासमवेत पुण्यात आले. त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने या विवाहितेला मदत केलेल्या तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यानंतर या तरुणींना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करून ३ ऑगस्टला पोलिस आयुक्तालयात उग्र आंदोलन करण्यात आले. शिवीगाळ करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/zQ71t3R

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.