आखाडा बाळापुर ते पावनमारी मार्गावर कांडली फाट्याजवळ दोन भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तारीख 24 रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पावनमारी येथील भारत मिरटकर व मनकणीबाई मिरटकर हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आखाडा बाळापूर येथे कामानिमित्त आले होते. आखाडा बाळापूर येथे काम आटपून ते दोघेही सात वाजण्याच्या सुमारास पावनमारी गावाकडे निघाले होते. यावेळी दांडेगाव कडून कांडली फाटा येथे येणाऱ्या भरगाव दुचाकीची त्यांच्या दुचाकी सोबत धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकी वरील भारत मिरटकर, मनकर्णाबाई मिरटकर (रा पावनमारी), बाबाराव बळवंते (रा दांडेगांव), पांडुरंग रिठे ( रा पिंपळदरी) हे चौघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, उपनिरीक्षक गणेश घोटके, महामार्ग पथकाचे उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, जमादार सय्यद तय्यब, शेषराव पोले, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली आहे. या अपघातामध्ये चौघांच्या डोक्याला, हाताला, पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याची पोलिसांनी सांगितले . या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gDHI4Ot
कांडली फाट्याजवळ दोन दुचाकीच्या अपघातात चार जण गंभीर जखमी:उपचारासाठी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
August 24, 2025
0