उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कडक भूमिका घेतली आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या केल्याने बारामतीची बदनामी होत असून, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. या गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. स्वातंत्र्यदिनी 30 मीटर उंच राष्ट्र ध्वजाच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, युपी-बिहारमधून कामधंद्यासाठी लोक येतात. पण एकाने आठ वर्षांच्या मुलीवर, तीही युपीचीच असताना, बलात्कार केला. शेवटी बदनामी बारामतीची होते. अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका, त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. लाइन मारायला गेला तर टायरखाली घालतो बारामती तील टवाळक्या करणाऱ्या तरुणांनाही अजित पवारांनी चांगलेच फटकारले. कुणी कुठेतरी लाइन मारायला गेला तर तुझी लाइनच काढतो आणि टायरखाली घेतो, अशा कठोर शब्दांत त्यांनी तरुणांना इशारा दिला. कोणालाही अजिबात सोडणार नाही. प्रत्येकाने कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पिंपरी चिंचवड मध्ये विकास करताना मला अनेकदा अतिक्रमणे काढावी लागली. कोणाच्या पोटावर पाय द्यावा अशी भावना माझी नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करायचे आहे, त्याबद्दलचे प्रयत्न चालू आहेत. अनधिकृत बॅनर बाजी करणाऱ्यांवर कारवाई करा अजित पवारांनी शहराच्या विद्रूपीकरणावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी एकही पोस्टर लागत नाही, कारण हायकोर्टाचे आदेश आहेत. इथे अजित पवारचा वाढदिवस असला तरी एक जरी पोस्टर लावला तरी तो काढून जप्त करा. अजित पवार पासून सुरुवात करा, कोणाचे लाड ठेवू नका, असे आदेश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. आपले शहर अनधिकृत बॅनर लावून विद्रूप करू नका, असेही ते म्हणाले. ..तरीसुद्धा कारवाई करा अजित पवार म्हणाले की, मला कोणीतरी फोटो पाठवले, कोणीतरी अचानक येऊनच इथे ऑफिस काढलं. ही जागा तुमच्या घरची आहे का? ही बारामतीकरांची जागा आहे. असे कसे तुम्ही ऑफिस टाकू शकता? चिप ऑफिसर अधिकारी कसे गप्प बसतात? उद्या अजित पवारच्या उजव्या हात वाल्यांनी जरी ऑफिस टाकलं तरी त्याच्यावर कारवाई करायला अजिबात मागेपुढे बघायचं नाही. आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कुणाची दादागिरी, गुंडगिरी असता कामा नये. सर्वांनी शिस्तीचे पालन करावं.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ohZxtbj
बारामतीची बदनामी खपवून घेणार नाही; गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करा:‘लाईन मारायला गेला तर टायरखाली घालतो’; अजित पवारांचा टवाळखोर तरुणांना सज्जड दम
August 15, 2025
0