गणपती बाप्पा म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहते ती हातात लाडू आणि पोट मोठं असलेली प्रतिमा. बाप्पा अवघ्या काही दिवसांतच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगमनाची आस संपूर्ण पंचक्रोशीत लागलीय. बाप्पा घरी आला की वातावरण कसं अगदी प्रसन्न होऊन जातं. घरात असले नसलेले क्लेश दूर होतात आणि सर्वजण एकत्र येऊन बाप्पाला पूजतात. त्याची आराधना करतात. बाप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात असलेलं विघ्न दूर करून आनंदी वातावरण निर्माण करतो. पण त्याच आनंदी वातावरणाला दूषित करण्याचं काम आपण करतो... म्हणण्याचा अर्थ हाच की, गणपती बाप्पाला आपण आणतो तेव्हा आपण काय पाहतो? त्याचा रंग, रूप आणि त्याची रचना पाहतो. पण आपण एक गोष्ट विसरतो... ती म्हणजे मूर्ती शाडूच्या मातीची आहे की, पीओपीची (प्लास्टर ऑफ पॅरिस)... आता तुम्ही म्हणाल की, मूर्ती कशाची का बनलेली असेना बाप्पा बाप्पा असतो. पण असं योग्य आहे का? ज्या सृष्टीची निर्मिती ज्याने केली आहे, तोच पर्यावरणाला हानिकारक होतोय असं म्हंटल तर... किती भयानक वाटत न ऐकायला. अहो मग आपण तेच तर करत आहोत ना... देवाने एवढ्या सुंदर निसर्गाची निर्मिती केली आहे. इथले जीव, जंतू या पृथ्वीची सुंदरता वाढवतात आणि आपण सणांच्या नावाखाली, सुंदर रूपाच्या आणि उंचीच्या नावाखाली गणपतीची मोठी मूर्ती बनवून गाजावाजा करतो मात्र हा विचार करत नाही की, ते पर्यावरणाला किती हानिकारक आहे. POP ची गणपतीची मूर्ती पर्यावरणावरील एक संकट !! POP ही एक कृत्रिम रसायनमिश्रित पांढरी धूळ असून तिचा वापर मूर्ती बनवण्यासाठी केला जातो. ही धूळ पाण्यात मिसळल्यावर घट्ट होते आणि त्यावर हवे तसे आकार व रंग देता येतात. हेच गुण पाहता अनेक मूर्तिकार POP वापरतात कारण ती स्वस्त असते, हलकी असते आणि लगेच तयार करता येते. पण नेमकी हीच सोय प्रकृतीच्या अस्वस्थतेला कारणीभूत ठरते. POP हा पदार्थ निसर्गात सहजपणे विघटित होत नाही. हा पदार्थ gypsum पासून बनवला जातो. एकदा POP पाण्यात मिसळून वाळवला की, तो फारच कठीण होतो आणि सहज विघटन होत नाही. जेव्हा POP मूर्ती विसर्जनासाठी तलावात किंवा नदीत टाकली जाते, तेव्हा ती वर्षानुवर्षे तशीच राहते, विघटित होत नाही. यामुळे पाणथळ जागेचं नैसर्गिक संतुलन बिघडतं. जेव्हा या मूर्तींचं विसर्जन तलावात, नद्या, समुद्र यामध्ये केलं जातं, तेव्हा त्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत. उलट त्या पाण्यात अडकून राहतात, तळाशी बसतात आणि तलावाचं स्वच्छ, नैसर्गिक रूप हळूहळू गमावतं. अशा मूर्तींवर वापरले जाणारे रंग आणि सजावटीसाठी वापरण्यात येणारे झिलमिल पदार्थ अनेक वेळा रासायनिक आणि विषारी असतात. यातून पाण्यात lead (सीसा), mercury (पारा), cadmium आणि इतर धोकादायक धातू मिसळतात. यामुळे मासे, कासव, बेडूक यांचं अस्तित्व धोक्यात येतं. इतकंच नाही, तर या प्रदूषित पाण्याचा वापर जर शेतीसाठी किंवा प्यायच्या पाण्यासाठी झाला, तर माणसांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे मोठा गणपती जरी आकर्षक वाटत असला तरी निसर्गासाठी तो हानिकारक आहे. म्हणजेच काय तर एकीकडे आपण गणपती बाप्पाला "मंगलमूर्ती मोरया" म्हणत मोठ्या श्रद्धेने पूजतो, तर दुसरीकडे त्याची मूर्ती विसर्जित करताना आपणच निसर्गाचा अपमान करत असतो. बाप्पाचा उत्सव जितक्या भक्तीने साजरा होतो, तितक्याच निसर्गप्रेमाने तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हायला हवा. शाडू माती ही एक नैसर्गिक आणि जैवविघटनशील माती असते. ती सहसा नदीकिनाऱ्यांवर किंवा तलावाजवळ सापडते आणि अतिशय मृदू, चिकटसर आणि सुलभपणे आकार घेणारी असते. त्यामुळे तिचा वापर मूर्ती बनवण्यासाठी अगदी योग्य मानला जातो. आज ज्या वेगाने POP मूर्तींमुळे जलप्रदूषण होत आहे, त्याच्या तुलनेत शाडू माती ही पर्यावरणाशी एकरूप होणारी शांत, संयमित आणि संतुलित निवड आहे. POP मूर्तीच एकप्रकारे बाजारीकरणच झालं आहे. मोठमोठे मंडळं, स्पर्धा, लाइट्स, सजावट, सोशल मीडियावर व्हायरल होणारी आरास… यात मूर्ती एक उत्पादन बनते, उपास्य रूप राहात नाही. त्या स्पर्धेमध्ये कोणती मूर्ती मोठी, सुंदर, आकर्षक आहे याला जास्त महत्त्व दिलं जातं. मूर्ती कोणत्या भावनेतून बनवली गेली, तिच्या मागचं पर्यावरणीय दृष्टिकोन काय आहे, हे विचारलंही जात नाही आणि नाही त्याचा विचार केला जातो. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनानेही काही ठिकाणी POP मूर्तींवर बंदी आणलेली आहे, परंतु ती संपूर्णतः यशस्वी होण्यासाठी आपल्याला म्हणजेच सामान्य लोकांना पुढाकार घ्यावा लागेल. सजावट, स्पर्धा, आकर्षण या सगळ्या गोष्टींमधून पर्यावरणाचं भान सुटू नये, याची काळजी घेणं हीच खरी निसर्गपूजा ठरेल. हे केवळ तलाव आणि नद्या प्रदूषित करणं नाहीये, तर आपल्या आध्यात्मिकतेचं आणि परंपरेचंही प्रदूषण आहे. आपल्याला हे समजायला हवं की निसर्ग म्हणजेच बाप्पाचं मूळ रूप आहे. तो चराचरात वसलेला आहे. निसर्गात, जंगलात, पाण्यात, पक्षात मग आपणच त्याला झिरो ऑक्सिजन असलेल्या तलावात विसर्जित करून त्याचं अस्तित्व गुदमरत का टाकतो? यावर बोलताना मूर्तिकार 'मंगेश छत्रे' असं म्हणतात की, "POP च्या मूर्तींवर अनेक जणांचे पोट आधारलेलं आहे. अनेकांचा त्यामुळे उदरनिर्वाह होतो. तसेच POP च्या मूर्ती बनवणं खूप सोपं असतं. त्याला मेहनत कमी लागते आणि वेळेचीही बचत होते. तसेच साच्यात टाकल्या टाकल्या त्याला आपल्याला हवा तसा आकार दिला जातो. त्यामुळे POP च्या मूर्ती घडवण्याचा आवाका वाढला आहे." मनुष्य हा एक असा प्राणी असा आहे, जो नवनवीन गोष्टी आत्मसाद तर करतो. मात्र, त्याचा पर्यावरणावर काय आणि कसा परिणाम होईल याचा विचार केला जात नाही. नकळतपणे तो अनेकांचा व्यवसाय बनतो आणि त्यांचं आयुष्य त्या गोष्टीशी जोडल्या जात. शाडूची मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक की उपयोगी? आपण POP मूर्ती वापरतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की आपण फक्त एक पर्यावरणद्वेषी मूर्ती घेतली. त्याच्या पलीकडे एक सांस्कृतिक अध:पतन लपलेलं आहे. कारण पारंपरिक मूर्ती म्हणजे शाडू मातीची मूर्ती आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळी जेव्हा ॲडव्हान्स गोष्टींचा शोध लागला नव्हता तेव्हा मातीच्या साहाय्याने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली जायची आणि त्याची पूजा केली जायची. त्यामध्ये लाल माती, काळी मातीचा वापर केला जायचा. त्याला रंग देण्यासाठी तसेच मूर्तीला आकर्षक बनवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जायाचा. ते रंग मूर्तीवरती चिकटले जावे म्हणून त्यामध्ये डिंकाचा वापर केला जायचा. जो आजही अनेक कलाकार करतात. जे शाडूच्या मातीचा वापर करून बाप्पाची मूर्ती बनवतात. शाडूच्या मातीची मूर्ती ही एक पारंपरिक संकल्पना तर आहेच पण त्याचबरोबर ती मातीतून बनते आणि मातीतच मिसळते. ही मूर्ती म्हणजे आपल्या मातीशी असलेली नाळ आहे. ती नाळ तोडून आपण जेव्हा केवळ बाह्य आकर्षणाच्या मागे धावतो ना, तेव्हा या गणेशोत्सवाचा आत्माच हरवतो. गेल्या काही वर्षांत अनेक लोक पर्यावरणपूरक मूर्तींचं महत्त्व समजू लागले आहेत. काही शाळा आणि संस्था तर बीजगणेश नावाचा उपक्रमही चालवतात. जिथे मूर्तीमध्ये वृक्षाच्या बिया असतात आणि विसर्जनानंतर ती मूर्ती मातीमध्ये मिसळून झाड उगवतं. हाच तर खरा "संकटहर्ता" जो निसर्ग वाढवतो. यावरती बोलताना मूर्तिकार 'दिनेश तेंडुलकर' म्हणतात, " शाडूच्या मातीची मूर्ती बनवणं हे माझ्यासाठी आणि निसर्गासाठी एक आनंद आहे. मी व्यवसाय म्हणून या गोष्टी करत नाही तर, मी जेव्हा बाप्पाचा विसर्जन करायला गेलो होतो तेव्हा मी बाप्पाची विटंबना पहिली होती. ज्या बाप्पाची आपण सलग ११ दिवस मनोभावे सेवा करतो. त्याला १२ व्या दिवशी अस्थाव्यस्त अवस्थेत पाहतो. तेव्हाच ठरवलं की, आपण नैसर्गिक पद्धतीने मूर्ती बनवायची आणि पर्यावरणाला हातभार लावायचा. शाडूची माती ही निसर्गासाठी हानिकारक नसते. जेव्हा आपण मूर्तीच विसर्जन करतो तेव्हा ती पाण्यात २० ते ३० मिनिटात विरघळते. तेच पाणी आपण झाडांना आणि आपल्या शेतात नेऊन टाकू शकतो. म्हणजे आपल्याला बाप्पाचा आशीर्वादही मिळतो आणि निसर्गाला त्रासही होत नाही. त्यामुळे शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले पाहिजे. केवळ शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करणं म्हणजे निसर्गाला हातभार लावणं नव्हे, तर बाप्पाला आकर्षक बनवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करणेही गरजेचं आहे." गणेशोत्सव ही आपल्या संस्कृतीतील एक अनमोल परंपरा. हर्षोल्हासाने साजरा होणारा हा उत्सव फक्त धर्माचा भाग नाही, तर समाज, कुटुंब आणि निसर्ग यांच्यातील एक सेंद्रिय नातं आहे. या नात्याचा केंद्रबिंदू म्हणजे गणपती बाप्पा ज्याच्या रूपात आपण विघ्नहर्ता पाहतो, पण त्याचवेळी त्याला मातीच्या मुळाशी जोडलेलं एक रूप म्हणूनही ओळखतो. त्यामुळेच गणेशमूर्ती ही शाडू मातीपासून बनलेली असणं अधिक अर्थपूर्ण ठरतं. शाडू माती ही एक नैसर्गिक आणि जैवविघटनशील माती असते. ती सहसा नदीकिनाऱ्यांवर किंवा तलावाजवळ सापडते आणि अतिशय मृदू, चिकटसर आणि सुलभपणे आकार घेणारी असते. त्यामुळे तिचा वापर मूर्ती बनवण्यासाठी अगदी योग्य मानला जातो. POP ची मूर्ती बनवणं जेवढं सोपं आहे, त्याचप्रमाणे तिला हाताळणंही सोपं आहे. त्याउलट जर आपण शाडूच्या मूर्तीबद्दल विचार केला तर ती बनवण्यासाठी वेळ, श्रम खूप जास्त लागते. कारण ही माती हवा तसा आकार घेते मात्र, ती जेव्हा बनवून तयार होते तेव्हा तिला हाताळणं थोडस अवघड जात. त्यामुळे अनेकजण या कारणामुळे म्हणतात की, POP ची मूर्ती योग्य वाटते. मात्र असं जरी असलं तरी पर्यावरणाचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आज ज्या वेगाने POP मूर्तींमुळे जलप्रदूषण होत आहे, त्याच्या तुलनेत शाडू माती ही पर्यावरणाशी एकरूप होणारी शांत, संयमित आणि संतुलित निवड आहे. शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती पाण्यात सहज विरघळते. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी पाण्यात कोणतेही रासायनिक द्रव्य, धातू, किंवा रंग मिसळत नाहीत. या मूर्तींचं विघटन काही तासांत होऊन जाते आणि त्यामुळे तलाव, नद्या यांचं प्रदूषण होण्याचा धोका टळतो. शाडू मातीमुळे जलचर प्राण्यांचं जीवन धोक्यात येत नाही आणि त्यामुळे संपूर्ण जैविक परिसंस्था (ecosystem) सुरक्षित राहते. याशिवाय, शाडू मातीचा वापर केल्यामुळे मूर्ती तयार करताना मूर्तिकारांमध्येही एक प्रकारची सर्जनशीलता आणि संयम टिकून राहते. POP इतकी पटकन तयार होत नसल्यामुळे शाडू मातीची मूर्ती बनवताना वेळ लागतो, काळजी घ्यावी लागते आणि हीच प्रक्रिया भक्तिभाव वाढवते. बाप्पा म्हणजे गती, पण ती गती निसर्गाशी जुळवून घ्यावी लागते, हे शाडू माती शिकवते. एक विशेष गोष्ट म्हणजे, शाडू मातीच्या मूर्तीवर वापरले जाणारे रंगसुद्धा जर नैसर्गिक असतील (हळद, गेरू, फुलांची पूड इत्यादी), तर ती मूर्ती पूर्णतः पर्यावरणस्नेही ठरते. अशा मूर्ती विसर्जनानंतरही कोणतेही पदार्थ उरवत नाहीत आणि निसर्गाला नवी ऊर्जा देतात. या मूर्तींचा आणखी एक सकारात्मक पैलू म्हणजे घरीच विसर्जन करणे. छोट्या टाकीत, पितळी बादलीत किंवा कुंडीतही ही मूर्ती सहज विरघळते. त्यामुळे सार्वजनिक जलस्रोतांवरील ताण कमी होतो. काही लोक तर शाडू मातीच्या मूर्तींच्या विसर्जनानंतर उरलेली माती कुंडीत झाडांना घालतात आणि तिथून एक नवं जीवन चक्र सुरू होतं. गणपती बाप्पा शारीरिक दृष्ट्या आपल्याला सोडून जातो मात्र तो झाडाच्या रूपात आपल्या सोबतीला कायम राहतो. शाडू माती ही केवळ मूर्ती बनवण्याचं माध्यम नाही, तर ती एक प्रकृतीशी नातं टिकवण्याची प्रक्रिया आहे. ती आपल्याला आठवतं ठेवते की गणेशोत्सव ही फक्त दहा दिवसांची सजावट नाही, तर एक शाश्वत मूल्य आहे. जिथे भक्ती, कला आणि पर्यावरण यांचा संगम होतो. गरज केवळ पाण्याच्या शुद्धतेची नाही, तर आपली विचारधारा शुद्ध करण्याची आहे. फक्त शासकीय आदेश आणि नियम यावर विसंबून चालणार नाही. ही जबाबदारी आपली आहे, आपल्या घरातील पहिल्या आरतीपासून ते विसर्जनाच्या शेवटच्या टाळीपर्यंत. गणेशोत्सव ही एक जबाबदारीची पूजा असायला हवी. कारण उत्सव संपतो, आरास हटते, पण निसर्गावर उमटलेला घाव मात्र वर्षानुवर्षे राहतो. त्या घावांचा परिणाम आपण पाहतो. पाण्याची गुणवत्ता घसरते, मासेमारी कमी होते, नदी-तलाव मृतप्राय होतात आणि अखेर आपल्या भविष्यात अंधार दाटतो. आज जर आपण POP मूर्ती नाकारली, तर उद्या आपल्या मुलांना शुद्ध पाणी, हरित निसर्ग आणि सुरक्षित पर्यावरण मिळेल. हीच आपली खरी गणेशभक्ती ठरेल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5N0UgsR
शाडूची गणेशमूर्ती: भक्ती, परंपरा आणि निसर्गरक्षणाचा खरा संगम:POP मूर्तींच्या आड लपलेलं प्रदूषण आणि शाडू मातीच्या मूर्तींचं पर्यावरणपूरक महत्त्व, जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमधून
August 15, 2025
0