Type Here to Get Search Results !

मराठी विज्ञान परिषदेच्या प्रश्नमंजुषामध्ये अमरावतीचा डंका:जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी पटकावली तिन्ही बक्षिसे

मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या खगोल प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचा डंका वाजला असून पहिले तिन्ही पुरस्कार या जिल्ह्याने जिंकले आहेत. खगोलीय घटनांबाबत समाजात असलेल्या अनेक शंका-कुशंकांचे निरसन होऊन वस्तुनिष्ठ माहिती समाजासमोर यावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे वेळोवेळी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. अशीच एक स्पर्धा खगोल प्रश्नमंजुषा नावाने घेण्यात आली. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस कुमारी श्रावणी गिरी (कमलाबाई टावरी इंग्लिश स्कूल, घुईखेड, ता. चांदूर रेल्वे) हिने पटकावले असून द्वितीय क्रमांक कुमारी यज्ञा डहाके (राजेश्वरी इंग्लिश स्कूल, अमरावती) आणि तृतीय क्रमांक लक्ष राईकवार (शिवाजी आयडियल स्कूल, अमरावती) याने पटकावले आहे. या प्रश्नमंजुषेत खगोलीय घटनांबद्दल माहिती विचारण्यात आली होती. त्यात बहुतेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मात्र अचूक आणि महत्वाची माहिती वरील तिघांनी व्यवस्थितपणे पुरवल्यामुळे त्यांना प्रथम तीन बक्षिसे घोषित करण्यात आली. त्यामुळे सदर विद्यार्थी व त्यांच्या शाळांसह मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचेही कौतुक केले जात आहे. ही शाखा विदर्भातील महत्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. येथील पदाधिकाऱ्यांनी मराठी विज्ञान परिषदेचे सर्व उपक्रम अमरावतीत व्यवस्थितपणे राबवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या संस्थेचे जाळे दिवसेंदिवस अधिक व्यापक केले जात असून त्याद्वारे वेळोवेळी सभा, संमेलने, शिबिरे तसेच कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे खगोलीय घटनांबद्दल अमरावती शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाली आहे. त्याचेच प्रतिबिंब या निकालात उमटल्याचे संबंधित शाळांमधील शिक्षकांचे म्हणणे आहे. चित्रकला स्पर्धेचेही आयोजन मराठी विज्ञान परिषदेने प्रश्नमंजुषेसोबतच चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. स्वर्गीय कुसुमताई सोनार यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १८९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त घेण्यात आली होती. त्यात अकोला, पुणे आणि सातारा येथील विद्यार्थी प्रथम तीन स्थानांवर राहिले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wmpNnRl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.