Type Here to Get Search Results !

एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम:आठवडाभरानंतरही तोडगा नाही, महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलनस्थळीच हरितालिका पूजन

नोकरीत कायम करा, या मागणीसाठी संपावर गेलेल्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) अधिकारी-कर्मचारी महिलांनी आज, मंगळवारी आंदोलनस्थळीच हरितालिका पूजन केले. महिलांचा महत्वाचा सण असला तरी आम्ही संपावर असल्याने घरी हा दिवस साजरा करु शकत नाही. त्यामुळे आंदोलनस्थळीच हा दिवस साजरा करतोय, असे संपकर्त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे परिचारिका प्रिती पवार यांनी स्पष्ट केले. शासनाने गेल्या वर्षीच या कर्मचाऱ्यांपैकी १० वर्षांची सेवा पूर्ण झालेल्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या १९ ऑगस्टपासून हे कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. परंतु आठवडा पूर्ण झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे धरणे आंदोलनासोबतच दररोज नव-नवे उपक्रम राबवून संपकर्ते या मुद्द्याकडे जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. या क्रमात सोमवारी सकाळी संपकर्त्यांनी जिल्हा परिषदेपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. शिवाय वाटेत जिल्हा परिषदेच्या सीईओ, जिल्हाधिकारी आणि खासदार यांना निवेदनही सादर केले. ‘आयटक’शी संबंधित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. आजच्या हरितालिका पूजेत प्रिती पवार यांच्यासह मोनाली खांडेकर व इतर महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. दरम्यान संप काळातील धरणे आंदोलनात दररोजप्रमाणे आजही अशोक कोठारी, डॉ. अंकुश मानकर आदींनी हजेरी लावली. या आंदोलनात जिल्ह्यातील २०० डॉक्टर, ६०० परिचारिका, फार्मासिस्ट, समुपदेशक, वार्ड बॉय, एमपीडब्ल्यू आदी दीड हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या सहभागामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. पाठपुरावा सुरुच, अद्याप तोडगा नाही सदर संपाची पार्श्वभूमी राज्य शासनाला कळवण्यात आली आहे. संपामुळे आरोग्य यंत्रणेची काय स्थिती झाली, याचाही अहवाल दररोज शासनाला पाठविला जातो. संप मिटविण्याच्यादृष्टीने शासनही प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप तरी त्यादृष्टीने काही ठोस बाहेर आले नाही. दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित न होऊ देता ती पुढे नेली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Rw07lCV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.