विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आणि काही ओबीसी नेते जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करण्याची सरकारची मानसिकता आहे का? असा सवाल करत, भाजपला मराठा आंदोलनात रस नसल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पूजा व महाआरती पार पडली. यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सरकार आणि लक्ष्मण हाके यांच्यावर उपरोक्त टीका केली. नेमके काय म्हणाले अंबादास दानवे? अंबादास दानवे पुढे म्हणाले, राज्यात सध्या शेतकरी आणि जनता अनेक अडचणींमध्ये आहे. मात्र सरकार अडचणीत असणाऱ्यांसाठी काही करू शकत नाही. उलट तेच अनेक विघ्न आणत आहेत. त्यामुळे गणरायानेच काहीतरी करावे अशी प्रार्थना केली. भाजपला मराठा आंदोलनात रस नाही मनोज जरांगे यांचा मोर्चा आज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. सरकार या मोर्चामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मराठा बांधव या अडथळ्याला जुमानणार नाहीत, असे अंबादास दानवे म्हणाले. भाजपला मराठा आंदोलनात अजिबात रस नाही. सतत खोटे बोलून जनतेची फसवणूक केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे का? उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना हेच सत्ताधारी सरकारला अधिकार आहे असे म्हणत होते. सरकारने आरक्षण द्यावे अशी देखील त्यांची मागणी होती. आता त्यांचे महायुतीचे सरकार आले आहे. सरकार प्रचंड बहुमतात आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारच्या मागे आम्ही उभे राहू. मात्र सरकारची मानसिकता आहे का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. लक्ष्मण हाके आतापर्यंत झोपलेले होते मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील काही नको आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांची भूमिकाही ओबीसींवर अन्याय करण्याची नाही. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठलाच वाद नाही. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच आंदोलन शांततेत सुरू आहे. मात्र काही तथाकथित ओबीसी नेते मधूनच उगवतात. आतापर्यंत ते झोपलेले होते", असा टोला अंबादास दानवे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना लगावला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/HRtAaQ5
भाजपला मराठा आंदोलनात रस नाही:जरांगेंच्या मागण्याी पूर्ण करण्याची सरकारची मानसिकता आहे का? अंबादास दानवेंचा घणाघात
August 27, 2025
0