पुणे शहरातील हडपसर भागातील रहिवासी असलेल्या बापू बाळकृष्ण कोमकर (४९) आणि त्यांच्या पत्नी कमिनी कोमकर (४२) यांचा लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ ऑगस्ट २०२५ रोजी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन शाखेत घडली आहे. कमिनी यांनी आपल्या पती बापू यांना लिव्हरचा भाग दान केला होता, मात्र शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका आणि राज्य मानवी अवयव प्रत्यारोपण विभागाने हॉस्पिटलला नोटीस बजावली असून, घटनेचा तपास सुरू आहे. ही घटना आरोग्य सेवेतील जोखीम आणि प्रत्यारोपण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी बापू आणि कमिनी कोमकर यांची लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. बापू हे यकृताच्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना कमिनी यांच्या लिव्हरचा भाग प्रत्यारोपित करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर बापू यांची प्रकृती अचानक खालावली आणि १७ ऑगस्ट रोजी कार्डिओजेनिक शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर, कमिनी यांची सुरुवातीला प्रकृती स्थिर होती, मात्र नंतर त्यांना देखील संसर्ग झाला आणि सेप्टिक शॉक व मल्टी-ऑर्गन डिसफंक्शनमुळे २१ ऑगस्ट रोजी त्यांचाही मृत्यू झाला. याबाबत कोमकर कुटुंबीयांनी सांगितले की, कमिनी या पूर्णपणे निरोगी होत्या आणि त्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारखे कोणतेही आजार नव्हते. या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबाने घर गहाण ठेवून पैसे उभे केले होते, ज्यामुळे ही घटना अधिक दुर्देवी आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम तात्पुरता स्थगित सह्याद्री रुग्णालयाच्या वतीने याबाबत सांगण्यात आले की, आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झाली आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. संपूर्ण आणि निर्बाध चौकशीसाठी आमच्या सहकार्याचा भाग म्हणून, आम्ही आमचा लिव्हिंग लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या इतर सर्व रुग्णालयीन सेवा, ज्यामध्ये इतर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) सेवा आणि शस्त्रक्रिया प्रक्रियांचा समावेश आहे त्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wTJS890
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचा हलगर्जीपणा?:लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित
August 26, 2025
0