स्कूल बसचालकाने ९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याच दिवशी एका रिक्षाचालकाने मागील सीटवर बसून ८ वीतील १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले. हा प्रकारदेखील ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टीव्ही सेंटर भागात घडला. या प्रकरणी संतोष मधुकर ठाकरे (४६, रा. एन-१३, हडको) याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली. १३ वर्षीय वंशिका (नाव बदलले) ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेते. तिची शाळा सुटल्यावर तिला वेगळ्या ॲक्टव्हिटीचे क्लासेस लावलेले होते. तेथून घेऊन जाण्यासाठी स्वतः पालक जायचे. मात्र ३० जुलैला वंशिकाचा शाळेसाठीचा रिक्षाचालक संतोष याने तिच्या वडिलांना फोन करून तिला घेऊन येऊ का, असे विचारले. नेहमीचाच चालक असल्याने त्यांनी त्यास होकार दिला आणि नराधम चालकाचा डाव यशस्वी झाला. त्याने टीव्ही सेंटर भागातील एका उद्यानाच्या समोर भरवस्तीमध्ये रिक्षा थांबवली. त्यानंतर तो मागच्या सीटवर आला. तेथे त्याने तिला अश्लील पद्धतीने स्पर्श केला. त्यावर वंशिकाने रडवल्या स्वरात ‘मी माझ्या पप्पांना सांगेन. असे काही करू नका,’ अशी बोलली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालकाने तिला थेट घरी आणून सोडले. घाबरलेली दिसल्याने आईने दिला विश्वास शाळेतून येताना नेहमी उत्साही असणारी वंशिका काहीशी निराश आणि घाबरलेली दिसली. त्यामुळे आईने तिला जवळ घेऊन विश्वास देऊन याबाबत विचारणा केली तरीदेखील वंशिका काहीही न बोलल्याने आईचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी अधिक विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे धक्का बसलेल्या आईने पतीला हा प्रकार सांगितला. त्या दांपत्याने आरोपीला फोन करून उद्यापासून वंशिका तुमच्या रिक्षाने येणार नाही अशी माहीती दिली. मात्र अखेर विचाराअंती त्यांनी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GrqwYSF
संभाजीनगरात स्कूल बस चालकानंतर सलग दुसऱ्या घटनेने संताप, आरोपीस अटक:आता रिक्षाचालकाचा मागील सीटवर बसून आठवीतील विद्यार्थिनीला अश्लील स्पर्श
August 06, 2025
0