राज्य परिवहन महामंडळाच्या आकोट-नागपूर बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेला धावत्या बसमध्येच हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला. या धक्क्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवार, २६ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास गुरुकुंज मोझरी बसस्थानकात घडली. धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये अनेक आजार वाढायला लागले आहेत. हृदय विकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचाच प्रत्यय या वृद्ध महिलेच्या रुपाने पुढे आला आहे. सदर वृद्ध महिला तळेगाव श्यामजीपंथ येथून अमरावतीच्या दिशेने प्रवास करीत होती. मात्र मध्येच या महिलेला मृत्यूने कवटाळल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या या महिलेची ओळख प्रमिलाबाई ओंकार खरबडे या नावाने झाली असून त्या ७३ वर्षांच्या आहेत. नागपूरकडे जाणारी ही बस (एम एच-१४, ३८८५) तळेगाव शामजीपंथ येथून निघाल्यानंतर गुरुकुंज मोझरी बसस्थानकावर पोहोचली. यावेळी ही प्रवासी महिला अचानक बेशुद्ध पडल्याचे चालक व वाहकासह प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने बस जवळच असलेल्या श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय येथे आणली. त्यानंतर सदर महिलेची तेथील डॉक्टरांनी तपासणी केली. परंतु त्यापूर्वीच सदर महिलेची प्राणज्योत मावळली होती. त्यामुळे त्या महिलेला त्यांनी मृत घोषित केले. त्यानंतर ही माहिती लगेच पोलिसांना कळवण्यात आली. तेही लगेच रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत असल्याचे समजते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/javFyVI
धावत्या एसटी बसमध्येच वृद्धेला हृदय विकाराचा धक्का:तळेगाव ते मोझरी आजीचा तो प्रवास ठरला अखेरचा
August 26, 2025
0