राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी पात्र शब्द होता तो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला तो ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. १० ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार, अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विदर्भातील ओबीसी संघटनांची दुसरी बैठक आज नागपुरात पार पडली. सरकारच्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यातील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली. सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाज मध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. याविरोधात रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी ओबीसी संघटनांनी आजच्या बैठकीत दर्शवली. त्यानंतर नागपुरात १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्च्याची घोषणा करण्यात आली आहे. जे कोणी या शासन निर्णयाविरोधात आहे त्या संघटना आणि नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करतो असे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. पक्षाचे बॅनर बाहेर ठेवून मोर्चात सहभागी व्हा यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ असो की, ओबीसी कार्यकर्ता असो ज्यांचा या शासन निर्णयाला विरोध आहे जे कोणी पक्षाची पादत्राणे बाहेर ठेवून या लढ्यात सहभागी होतील, त्या सगळ्यांचे या मोर्चात स्वागत असेल. या महामोर्चात कोणत्याही पक्ष किंवा संघटनेचा बॅनर नसणार, तर ओबीसी कार्यकर्ताच या मोर्चाचे निमंत्रक आणि आयोजक असणार आहे. जीआर रद्द झाला पाहिजे नागपुरात १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम इथून होणार असून, मोर्चाचा समारोप संविधान चौकात होईल. सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही हे असत्य सरकार सांगत आहे. त्यामुळे याविरोधात लढण्याची वेळ ओबीसी संघटनांवर आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला ओबीसी संघटना इशारा देत आहे तुम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावला आहे, हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल होणार सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात वकील संघटना देखील एकटवल्या असून नागपूर खंडपीठात सोमवारी याचिका दाखल होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात एक तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना झाली पण तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता आता समाजाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UJVb2id
हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात ओबीसी आक्रमक:आरक्षणाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार, 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये महामोर्चा
September 13, 2025
0