Type Here to Get Search Results !

उद्धवसेना मविआबाहेर पडू शकते:उद्धव ठाकरे राज दरबारी,मनपा एकत्र लढण्याची तयारी, शिवतीर्थवर 2.45 तास खलबते

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी उद्धव यांच्यासोबत पक्ष प्रवक्ते संजय राऊत होते. या दोघा बंधूंमध्ये सुमारे पावणेतीन तास खलबते झाली. मुंबईसह एमएमआर प्राधिकरण क्षेत्रातील निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र लढण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र यामुळे काँग्रेस अथवा महाविकास आघाडीला उद्धवसेना सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहेत. ऑगस्ट महिन्यात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ५० मिनिटे भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास उत्सुक नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, गणेशोत्सवादरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यामुळे त्यांच्यात युती होण्याची शक्यता पुन्हा वाढली. आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः ‘शिवतीर्था’वर जाऊन राज ठाकरे यांची पावणेतीन तास भेट घेतली आहे. ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेसोबत युती करणार असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी उद्धव यांच्या भेटी दरम्यान राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांची आई कुंदा ठाकरे उपस्थित होत्या.या भेटीदरम्यान ठाकरे बंधूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एकत्र भोजनही केले. या भेटीचा राजकीय अर्थ बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवानंतरही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. याचा थेट अर्थ असा आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट काँग्रेससोबत युती करणार नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ‘मराठी माणूस’ एकत्र येईल आणि भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होईल. यामुळे काँग्रेसलाही मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करण्याची संधी मिळेल. राज-उद्धव ठाकरेंच्या पुन्हा भेटीची ही ३ मुख्य कारणे १. कार्यकर्त्यांमधील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न : या भेटीमागचा उद्देश मनसे, उद्धवसेना कार्यकर्त्यांतील दुरावा दूर करणे आणि दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी प्रामाणिक काम करतील, याची खात्री करणे आहे. २. एकनाथ शिंदेंना धडा शिकवण्याचा इरादा : आपला मुलगा माहीम विधानसभेत एकनाथ शिंदेंमुळे पराभूत झाला, असा राज ठाकरेंचा ठाम समज आहे. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांना ठाणे, डोंबिवली-कल्याण मनपात ३. दसरा मेळाव्याला एका मंचावर : ठाकरे बंधू मनापासून पुन्हा जवळ येत असल्याचा संदेश पुन्हा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव आणि राज यांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दसरा मेळावा महत्त्वाचा दसऱ्याचा मुहूर्त हा हिंदू रीतिरिवाजानुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. ६० वर्षांपासून आपण दसरा मेळावा याच मुहूर्तावर घेत आहोत, असे सांगून ठाकरे बंधूंमधील संवाद जबरदस्त असून कधी कोणता निर्णय घ्यायचा आणि कधी कोणती घोषणा करायची, हे ते दोघे मिळून ठरवतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. यामुळे दसरा मेळाव्यात उद्धवसेना-मनसे यांच्या युतीची घोषणा शक्य असल्याचे मानले जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/d7W2arP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.