अभिनेता अक्षय कुमारच्या स्पेशल २६ चित्रपटात तोतया इन्कम टॅक्स अधिकारी बनून खोटी धाड टाकली जाते आणि कोट्यवधी रुपये लुटले जातात. याच चित्रपटाच्या कथेप्रमाणे सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये एक खोटा छापा टाकून कोट्यवधी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर छापा टाकत कोट्यवधीचे सोने आणि रोकड लुटल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. तोतया चार अधिकाऱ्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत घराची झडती घेतली. यात घरातील १६ लाखांची रोकड १ किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे २ कोटी मुद्देमाल जप्त केल्याचे सांगत तेथून पोबरा केला. त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार डॉक्टर म्हेत्रे यांच्याकडून जाणून घेतला. सुरुवातीला आपल्याला संबंधित तोतया खरे अधिकारी वाटल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिक तपासात पोलिसांनी हा छापा बोगस असल्याचे सांगितले आहे. तसेच सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, यापूर्वी या तोतयांनी जिल्ह्यात कुणाला गंडा घातला आहे का? याचाही तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांनी म्हेत्रे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ubV4of3
सांगलीत तोतयांनी धाड टाकून डॉक्टरला दोन कोटींना लुटले:कवठेमहांकाळमध्ये स्पेशल 26 चित्रपटासारखा प्रकार
September 15, 2025
0