छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा औद्याेगिक वसाहतीतून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठीच्या इंटरचेंजचे उद्घाटन २९ सप्टेंबरला केले जाणार आहे. यामुळे इंटरचेंजमुळे शहरातील वाहनधारकांचा समुद्धीवर प्रवेश करणे सोपे झाले आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजकांना आता थेट मुंबईसह इतरत्र माल वाहतूकही करता येणार आहे. त्यामुळे शेंद्रा बिडकीन ऑरिकमधील औद्योगिक मालाची वाहतूक आता जलद होणार आहे. पर्यायाने जालना रोडवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीला २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २९ सप्टेंबर २०२४ रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले होते. या निमित्ताने वर्षपूर्तीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिडकीनमध्ये वाढतेय गुंतवणूक बिडकीनमध्ये सातत्याने गुंतवणूक वाढत आहे. सध्या आठ हजार एकर जागेपैकी उद्योगासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे नव्याने जागेचे भूसंपादन केले जाईल. येथे ७८९९० कोटीची गुंतवणूक आलेली असून या माध्यमातून ३५७४६ रोजगारही मिळेल. या कार्यक्रमानिमित्त उद्योजकांचा सत्कारही केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेबसाइटचे उद्घाटनही केले जाणार आहे. उद्योजकांचा वाचेल वेळ सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर म्हणाले, इंटरचेंजमुळे छत्रपती संभाजीनगरला मोठा फायदा होणार आहे. शेंद्र्यातील उद्योगांना थेट मुंबई गाठता येईल. उद्योजकांचा वेळ आणि इंधन खर्चही वाचेल. तसेच जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. मसिआचे उपाध्यक्ष राहुल मोगले म्हणाले, जयपूर, सटाणा एमआयडीसीला देखील याचा फायदा होईल.भविष्यात येथील वाहतूकही समृद्धीमार्गे होऊन लघु उद्योगांना फायदा होणार आहे. उद्योगांना फायदा होणार, वेळ वाचेल शासनाकडून सातत्याने शहरात गुंतवणूक वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच पायाभुत सुविधा वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. वर्षपूर्तीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाईल. शेंद्रातून उद्योजकांना मालवाहतुकीसाठी समृद्धी महामार्गामुळे फायदा होईल. त्यांचा वेळही वाचेल. - अतुल सावे,ओबीसी विकास मंत्री उद्योगांना होणार फायदा एमआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलीकनेर म्हणाले, यामुळे उद्योगांना आता थेट समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने एमआयडीसीतील वाहतुकीसाठी त्याचा फायदा होणार आहे. याबाबत बिडकीन एमआयडीसीची वर्षपूर्ती आणि शेंद्राला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंटरचेंजचे उद्घाटन केले जाणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AzycR1b
‘बिडकीन’ वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ‘समृद्धी’च्या शेंद्रा येथील इंटरचेंजचे 29 सप्टेंबरला उद्घाटन:उद्योगांना वाहतुकीसाठी होणार फायदा, वेळही वाचणार- अतुल सावे
September 20, 2025
0