आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकर्त्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ… शिव-शंभूभक्तांची अफाट गर्दी… आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक… असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिव-शंभूप्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. निमित्त होते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल-ताशांची रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे. 3 हजारपेक्षा अधिक ढोल, 1 हजारपेक्षा अधिक ताशा, तसेच 500 ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे करण्यात आले होते. या निमित्ताने हजारो शिव-शंभू भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. फोटो... शिव गीतांचे प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानवंदना सादर केली. यानंतर हिंदू भूषण ट्रस्ट स्मारकाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ‘‘युगत मांडली…’’, ‘‘शिवरायांच्या बुद्धीयुक्तीचा लागना पारं..’’ , ‘‘शिवबा राजं… शिवबा राजं…’’ अशा गीतांवर हजारो प्रेक्षक आणि वादकांनी ताल धरला.ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शिववंदना आणि ध्वज प्रणामाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात जोरदार आतिषबाजी करण्यात आली. महाराष्ट्रभरातून पथके दाखल… महाराष्ट्रातील शंभरहून अधिक नामांकित ढोल-ताशा पथके यात सहभागी झाली होती. कार्यक्रमासाठी पार्किंग, भोजन, पिण्याचे पाणी, तसेच वैद्यकीय सेवा अशा आवश्यक सर्व सुविधा सज्ज होत्या. नियोजित आणि चोख नियोजनामध्ये हा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.या मानवंदनासाठी महाराष्ट्रातून अनेक नावाजलेले ढोल ताशा पथक सहभागी झाले. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड लगतच्या अनेक भागातून शिवशंभु प्रेमींनी या मानवंदनेचा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. ‘‘लंडन बूक ऑफ रेकॉर्ड’’ मध्ये नोंद… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हे स्मारक जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झाली आहे. याशिवाय रविवारी देण्यात आलेली मानवंदना यासाठी ढोल ताशा पथकांची उपस्थिती हे देखील नोंद पहिल्यांदाच झाली असून, याबद्दल ‘‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’’ द्वारा हिंदू भूषण ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZQAJrwM
धर्मवीर संभाजी महाराजांच्या शिल्पाला ऐतिहासिक मानवंदना:3 हजार ढोल, 1 हजार ताशा आणि 500 ध्वजांसह महाराष्ट्रभरातील कलाकारांचा सहभाग
September 14, 2025
0