साताऱ्यातील गजवडी गावात महिलांना मालमत्तेत समान हक्क देऊन एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या आणि सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जमीन आणि घराच्या उताऱ्यावर पुरुषांच्या नावाबरोबरच महिलांची नावेही जोडण्यात आली आहेत. यामुळे गावातील 600 हून अधिक महिलांना त्यांच्या पतीच्या संमतीने घर आणि जमिनीवर समान अधिकार मिळाला असून, गजवडी गावाने स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील गजवडी गावाने एक अनोखा आणि क्रांतीकारक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणाचे एक नवे मॉडेल उभे केले आहे. या गावातील पुरुषांनी पुढाकार घेऊन पत्नीच्या संमतीने घराच्या आणि जमिनीच्या मालमत्ता कागदपत्रांवर (8-अ उतारा, सातबारा) त्यांचेही नाव नोंदवले आहे. यामुळे गावातील 350 हून अधिक महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार मिळाला असून, त्या स्वावलंबी बनल्या आहेत. महिलांच्या जीवनात क्रांती सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावातील 600 हून अधिक महिलांना या उपक्रमामुळे स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे. अनेक महिलांनी त्यांच्या स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत, तर काही महिला पतीसोबत खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे गजवडी गावाची चर्चा आता साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. महिलांच्या प्रतिक्रिया शामल जाधव म्हणाल्या, घरावर नाव लावल्यामुळे कोणतीही बँक योजना किंवा कर्ज सहज उपलब्ध होते. मी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला असून, यूट्युब चॅनेलही चालवते. याचा फायदा गावातील अनेक महिलांना झाला आहे. शुभांगी बळीप म्हणाल्या, पतीच्या सहकार्याने उताऱ्यावर नाव आल्याने कर्ज मिळाले. त्यातून मी दोन ते तीन म्हशी खरेदी केल्या आहेत. सिंधू राजेंद्र कदम म्हणाल्या, सातबाऱ्यावर नाव आल्यामुळे पतीसोबत शेती करताना आत्मविश्वासाने काम करता येते. याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. 2010 पासून उपक्रमाची सुरुवात गजवडी गावात हा क्रांतिकारी उपक्रम 2010 पासून सुरू झाला असल्याचे सीमा बळीप यांनी सांगितले. सुरुवातीला चारचाकी वाहनांवर लाउडस्पीकर लावून जनजागृती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या पुढाकाराने शेतजमिनीवर महिलांची नावे लावण्यास सुरुवात झाली, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाने केवळ महिलांना आर्थिक बळ दिले नाही, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची भावनाही निर्माण केली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FBWkzKE
साताऱ्यातील गजवडी गावाची अनोखी क्रांती:मालमत्तेत महिलांना समान हक्क, 350 हून अधिक महिलांना मिळाल्या समान संपत्तीचे अधिकार
September 22, 2025
0