बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ४९२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. पैकी १८९ हरकती आणि सूचनांवर आज (दिनांक १० सप्टेंबर २०२५) सुनावणी पार पडली. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग या ठिकाणी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी पार पडली. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी तथा राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) श्री. इकबाल सिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार यांच्यासह संबंधित अधिकारी या सुनावणीस उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या अंतर्गत दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावर शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ते गुरूवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या प्रारूप रचनेसंदर्भात एकूण ४९२ हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. यातील १८९ सूचना व हरकतींवर आज पहिल्या दिवशी सुनावणी पार पडली. दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना उद्या दिनांक ११ सप्टेंबर आणि परवा दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नानथराव भोसले मार्ग या ठिकाणी सुनावणीसाठी प्रत्यक्षात उपस्थित राहता येणार आहे. यासाठी पाठवलेल्या सूचना पत्रांप्रमाणे नागरिकांनी सुनावणीस उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GxfjLZp
मुंबई महानगरपालिका निवडणूक तयारी:प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त 492 पैकी 189 हरकती आणि सूचनांवर पहिल्या दिवशी सुनावणी पूर्ण
September 10, 2025
0