Type Here to Get Search Results !

पंचेचाळीस वर्षांपूर्वीही शरद पवार यांनी जळगावात काढली होती शेतकरी दिंडी:7 डिसेंबर 1980 रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली होती ‘शेतकरी दिंडी’ला सुरुवात

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी आक्रोश मोर्चा काढला. भरपावसातही हातात कांद्याच्या माळा घेऊन शेतकरी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ‘देशात व राज्यात सत्तेत बसलेले सरकार चाेर आहे. निवडणुकीच्या ताेंडावर शेतकऱ्यांना सातबारा काेरा करण्याचे आश्वासन या सरकारने दिले हाेते, मात्र ते चालढकल करीत आहेत. महिन्याच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा काेरा न केल्यास देवाभाऊंच्या सरकारमधील एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. कृषिमंत्री असताना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील २५ लाख बहिणींची नावे वगळल्याचा आरोप करीत त्यांना पैसे मिळवून देण्याचा शब्द दिला. तसेच नाशिक जिल्हा बँकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. आमदार रोहित पवार यांनी सरकारला सत्तेचा माज चढल्याचा आरोप केला. माेर्चात शरद पवारांसाठी खास ओपन हूडची जीप होती. तिच्या बोनेटवर कांद्यांनी भरलेल्या दोन टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. भाषाशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर कुर्ता, पायजमा आणि गळ्यात कांद्याच्या माळा घालून सहभागी झाले होते. पीककर्ज माफ करा, सातबारा काेरा करा, पिकाला हमीभाव द्या, अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्या, वगळलेल्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळालेच पाहिजे आदी प्रमुख मागण्यांसाठी वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवारांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे ४५ वर्षांपूर्वी वयाच्या ३८ ते ४० व्या वर्षी शरद पवारांनी तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्ध काढलेल्या शेतकरी दिंडीची हमखास आठवण झाली. खरे म्हणजे तोही मोर्चाच होता. पण, आध्यात्मिक डूब देण्यासाठी त्याला दिंडीचे नाव दिले होते. १९७८ मध्ये वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार ‘पुलोद’चा प्रयोग करीत पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. मात्र, हे सरकार केवळ दोन वर्षेच टिकले. इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या. शरद पवारांनी तोपर्यंत काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. महाराष्ट्रातल्या निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. मात्र, पवारांच्या नवख्या समाजवादी काँग्रेसनेही ५४ जागा मिळवल्या. मात्र, तरीही विरोधात बसावे लागले आणि विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांकडे आले. या वेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न देशात ऐरणीवर होता. शेतकऱ्यांमधील नाराजी ओळखून शरद पवारांनी जळगाव जिल्ह्यात सभा घेतली. याच वेळी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारला घेरण्याचे नियोजन केले. जळगावातून ‘शेतकरी दिंडी’ काढण्यात आली. शेतीमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतमजुरांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, ग्रामीण बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे, चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घेतलेच पाहिजेत, या मागण्या पवारांच्या या ‘शेतकरी दिंडी’च्या केंद्रस्थानी होत्या. जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या मैदानातून ७ डिसेंबर १९८० रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘शेतकरी दिंडी’ला सुरुवात झाली. जळगाव ते नागपूर हा ४५० हून अधिक किलोमीटर अंतराचा टप्पा. त्यामुळे शेतकरी दिंडीत चालण्यासाठी किती शेतकरी उपस्थिती लावतील याची शरद पवारांसह सगळ्यांनाच शंका होती. मात्र, या दिंडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला. शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्रात सांगतात की, ही दिंडी जेव्हा जळगावातून निघाली तेव्हा सुरुवातीला हजार-पाचशे लोक होते. जळगावातून बाहेर पडल्यावर ही संख्या पंधरा हजार झाली. पुढे बुलडाण्यात गेल्यावर पन्नास हजार झाली. पुढे अमरावतीला गेलो तिथे दोन-अडीच लाख लोक गोळा झाले. हे एक ऐतिहासिक अशा संयमाचे गांधी विचाराचे आंदोलन होते. पवार म्हणतात, ‘महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात दिंडीला एक महत्त्वाचे आणि भक्तिभावाचे स्थान आहे. या दिंडीत गावोगावच्या शेतकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दिवसभर भजन-कीर्तन होत असे. टाळ-मृदंगाच्या निनादात सगळेजण नागपूरच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे त्यांच्याविषयी विलक्षण कुतूहलही निर्माण झाले होते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी नेत्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषणे होत.’ पंढरीच्या वारीतल्या दिंड्यांच्या स्वागताचा बहुमान त्यांना ठिकठिकाणी मिळत होता. शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावं स्वयंस्फूर्तीनं करत होती. गावातील महिला हजारो भाकऱ्या तयार करून पाठवत असत. महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा या दिंडीला लाभला. शेतकरी दिंडीत सहभागी झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, ना. धों. महानोर अशी मातब्बर नेतेमंडळी सहभागी झाल्याने तिची परिणामकारकता वाढली होती. तसेच डॉ. श्रीराम लागू, नानासाहेब गोरे, गोदाताई परुळेकर यांसारख्या कला-सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचाही पाठिंबा मिळाला होता. जळगावातून जसजशी ही दिंडी नागपूरच्या दिशेने जाऊ लागली तसतसा दिंडीला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. शरद पवार म्हणतात, त्या वेळचे मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना परिस्थिती हाताळावी कशी हे कळेना. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचीही संख्या फुगतच चालली होती. नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशनही त्या वेळी सुरू होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/V05DZUm

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.