वसई-विरारमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नायगावहून मुंबईच्या दिशेने उपचारासाठी निघालेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथील चिंचोटीमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये या निष्पाप मुलावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कुटुंबीय रुग्णवाहिकेतून मुंबईकडे निघाले. मात्र, वाटेतच ते भीषण वाहतूक कोंडीत अडकले. रुग्णालयात वेळेवर पोहोचता न आल्याने त्या चिमुकल्याने रस्त्यातच प्राण गमावले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच सुरू असलेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईकडे निघालेल्या या मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नायगाव येथून मुंबईकडे निघालेली रुग्णवाहिका मुंबई-गुजरातकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक कोंडीत अडकली होती. सुमारे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तास या कोंडीत अडकल्यामुळे चिमुकल्याची तब्येत खालावली. अखेर हतबल झालेल्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेतून उतरून त्याला घोडबंदरजवळील ससूनवघर येथील एका छोट्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर भागातील वाहतूक कोंडी ही एक मोठी आणि जुनी समस्या आहे. या समस्येवर अनेक उपाययोजना करूनही ती अजूनही कायम आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xksSm7M
वसई-विरारमधील धक्कादायक घटना:वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा बळी, दीड वर्षाच्या मुलाचा ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू
September 19, 2025
0