गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा थेट परिणाम धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पावर झाला असून प्रकल्पात पाण्याचा साठा झपाट्याने वाढला आहे. आज दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रकल्पाची पाणी पातळी २८३.२० मीटर (८२.४२ टक्के) इतकी नोंदवण्यात आली. वाढत्या साठ्यामुळे प्रकल्प प्रशासनाने प्रचलन सुचीनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. आज रात्री ८.४५ वाजल्यापासून प्रकल्पाचे एकूण ९ दरवाजे प्रत्येकी ३० सें.मी. इतके उघडण्यात आले असून, २४७.३११ घन मीटर प्रति सेकंद इतका पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये अचानक पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी नदीकाठी पिके किंवा जनावरे न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून, नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर निम्न वर्धा प्रकल्पातून सुरू झालेला विसर्ग खालच्या प्रवाहातील गावांसाठी अधिक सावधगिरीचा इशारा ठरला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, आवश्यकतेनुसार आणखी निर्णय घेण्यात येणार आहेत. तीन वर्षाचा चिमुकला घरासमोरील नाल्यात गेला वाहून दुसरीकडे, वर्ध्यातील बोरगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तीन वर्षांचा चिमुकला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नगर येथे राहणाऱ्या पंकज मोहदुरे यांचा तीन वर्षांचा मुलगा 'डुग्गु' सायंकाळी झोपेतून उठून घराबाहेर आला. त्यावेळी खेळता-खेळता तो अचानक घराजवळील मोठ्या नाल्यात पडला. आजूबाजूला कोणीही नसल्याने तो पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. नालीला आलेल्या पुरामुळे हा चिमुकला तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत वाहत गेला. मुलाचा शोध सुरू असताना, तो गावाबाहेर असलेल्या चितोडा नाल्यात मृत अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हे ही वाचा... हिंगोली जिल्ह्यात धुवाँधार पाऊस:गुंडा शिवारात ओढ्याच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्या, प्रशासनासह गावकऱ्यांकडून शोध सुरू हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. १२ दुपारपासून विविध ठिकाणी धुवाँधार पाऊस झाला असून, वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात गयाबाई आंबादास सारोळे (६०) व सखुबाई विश्वनाथ भालेराव (५५) ह्या इतर महिलांसोबत शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस येत असल्यामुळे त्यांच्यासह इतर महिला शेतातून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी गुंडा शिवारातील ओढ्यावर पुराचे पाणी आले. या पाण्यातून त्या घराकडे येत असताना गयाबाई व सखुबाई ह्या दोघींना पाण्याचा अंदाज आलाच नाही. काही वेळातच त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. सविस्तर वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kXzFAUV
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी:निम्न वर्धा प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले; तीन वर्षाचा चिमुकला नाल्यात गेला वाहून
September 12, 2025
0