जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून चित्तेपिंपळगाव तांडा नं. २ येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर लालचंद चव्हाण (५०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर बळीराम बबन रिठे, विष्णू दत्तू घोडके अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मृत चव्हाण यांच्या पत्नी रेणुका यांच्या फिर्यादीनुसार, २००९ मध्ये प्रभाकर चव्हाण यांनी गावातील विष्णू दत्तू घोडके यांच्याकडे ५ गुंठे जमीन गहाण ठेवली होती. त्यांनी पैसे परत करूनही विष्णू घोडके यांनी ती जमीन परत देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे, तर तीच जमीन त्यांनी गावातील बबन श्रीपत रिठे आणि सुखदेव सूर्यभान रिठे यांना विकली. तेव्हापासून चव्हाण आणि रिठे-घोडके कुटुंबात जमिनीवरून सतत वाद सुरू होता, ज्यामुळे चव्हाण कुटुंब मानसिक तणावाखाली होते. ३० ऑगस्ट रोजी सकाळी रिठे-घोडके कुटुंबातील १०-१२ जण अचानक प्रभाकर चव्हाण यांच्या घरी आले. त्यांनी थेट जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी बळीराम रिठेने प्रभाकर यांच्या पत्नी रेणुका चव्हाण, त्यांची १७ वर्षांची मुलगी आणि मुलगा विशाल यांना मारहाण केली. कृष्णा रिठेने त्यांना पकडून ठेवले. बळीराम रिठेने तर चक्क मुलीच्या लग्नासाठी सात लाख रुपये देतो, पण जमीन माझ्या नावावर कर अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. नातेवाइकांनी घेतला आक्रमक पवित्रा या वादाच्या वेळी चिकलठाणा पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. जोपर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. सोमवार, १ सप्टेंबरला नातेवाइकांनी घाटी व चिकलठाणा पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांची तक्रार घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JA1mIrV
दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल:जमिनीच्या वादातून चित्तेपिंपळगावच्या शेतकऱ्याने विष घेऊन केली आत्महत्या
September 01, 2025
0